breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी: नातू रोहित पवारांचे आवाहन

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा, असे आवाहन पवारांचे नातू रोहित पवार यांनी केले आहे. तसेच आपण हे आवाहन एक नातू म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून करत आहोत असेही रोहित यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

”पवारसाहेबांच्या निर्णयाचा आम्ही सर्वजणच आदर करतो. पण या आदराच्या पुढे प्रेम असतं. आणि म्हणूनच माझं व माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा”, अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी आपल्या आजोबांच्या समर्थनार्थ केली आहे.

दरम्यान, या फेसबुक पोस्टनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, पवारसाहेबांनी माढ्यातून लोकसभा निवडणूकीतून माघार घेऊ नये असे मला एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून वाटते. माझ्यासह राज्यभरातील हजारो-लाखो कार्यकर्त्यांचीही तशीच इच्छा आहे. त्यामुळे मी हे आवाहन केले.

पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबियांत काही वाद आहेत काय? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले की, पवार कुटुंबिय कालही एक होते, आजही आहे आणि उद्याही एक राहील. एकीची ताकद काय असते हे आम्हा पवार कुटुंबियांना माहित आहे. आमच्या कुटुंबांत पार्थच्या उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. मावळमधील स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने पार्थ यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, पवार साहेबांनी माढ्यातून लोकसभा लढविली पाहिजे असे पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे असे रोहित यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माढ्यातून माघार घेतल्याने राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. पवारसाहेबांनी असा अचानक निर्णय घ्यायला नको होता. याचा पक्षावर व कार्यकर्त्यांच्या मनोधौर्यावर परिणाम होईल अशी भीती पक्षातील नेते खासगीत व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, माघार घेऊ नये असा आग्रह पुन्हा एकदा धरणार असल्याचे समजते. मात्र, पवार फेरविचार करण्याची शक्यता नाही असे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button