breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय महत्वाकांक्षेमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांत समन्वयाचा अभाव   

  • आपापसातील मतभेदांमुळे कार्यकर्ते झाले दिशाहीन
  • महापालिका निवडणुकीत पक्षाला बसणार मोठा फटका

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

मोठमोठी पदे देऊन सुध्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना आणखी हाव सुटलेली आहे. त्यातून पक्षांतर्गत हेवेदावे वाढल्याने आपलाच वारू पुढे रेटण्यासाठी प्रत्येकजण वाटेल त्या थराला जात आहे. चारजणांची तोंडे चारी दिशेला झाल्यामुळे मतभेद निर्माण झाले आहेत. कोणीच कोणाचे ऐकत नसल्यामुळे राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रगतीच्या दिशेकडे न धावता अधोगतीच्या मार्गाने गतीमान झाल्याचे दिसत आहे. प्रत्येकाची राजकीय महत्वाकांक्षा वाढू लागल्याने स्थानिक पदाधिका-यांत समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

मागील आठवड्यात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर ”लेटर बाँब” टाकला. साडेतीन वर्षाच्या सत्ताकाळात आयुक्तांच्या त्रुटी जगतापांच्या निदर्शनास आल्या नाहीत. जगताप म्हणतील तसेच आयुक्तांनी पालिकेचे कामकाज केल्याचे शहरातील सामान्यातला सामान्य नागरिकही सांगू शकेल. एक-दोन निर्णय काय आयुक्तांनी परस्पर घेतले की लगेच नाकाला झोंबले. तातडीने आयुक्तांवर आरोपवजा इशारा देणारी पत्रकबाजी करून जगतापांनी भाजपप्रती प्रचंड निष्ठा असल्याचे दाखवून दिले. याला प्रत्युत्तर म्हणून महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी लागलीच ”’टीडीआर’चा मुद्दा उपस्थित करून जगतापांवर शरसंधान साधले”, अशा आशयाचे पत्रक त्यांनी प्रसिध्द केले. वाकडचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी पुन्हा तोच कित्ता गिरविला. ”जगतापांनी आमदारकीचा राजीनामा देऊन नगरसेवक व्हावे आणि महापालिकेत डोके घालावे”, अशा आशयाची पत्रकबाजी करणे अजिबात योग्य ठरत नाही. नाना काटे यांनी जगतापांना उत्तर दिले असताना कलाटे यांनी असे करताना काटे यांच्या पदाचे गांभीर्य तरी ठेवायचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. हे पक्षाला मारक ठरते.

राज्यात विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड होणार आहे. विधानपरिषदेवर आपल्याला संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान असेल तर त्यांनी प्रदेश पातळीवरील पक्षाच्या पदाधिका-यांची शिफारस घेऊन राज्यपालांकडे अर्ज सादर करायला हवा. त्याला पक्षाचा होकार मिळणे अत्यावश्यक असते. तत्पुर्वीच, पाटीलांनी आपल्या पेद्यांना पुढे करून सोशल मीडियावर कल्ला केला. तसेच, मयूर कलाटे हे सुध्दा विधानपरिषदेसाठी आधुनमधून उठबशा काढताना दिसले. कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांचे वेगळेच धोरण असते. माजी महापौर मंगला कदम यांना सुध्दा पक्षकार्यात सक्रिय व्हावे असे वाटत नाही. यांच्यामधून अविश्वासाचे वारे वाहू लागल्याने पाटील, कलाटे, शितोळे आणि कदम यांची नावे आता बॅकफुटला गेली आहेत. आता माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांना विधानपरिषदेच्या जागेसाठी फाईल तयार करण्याचा मॅसेज पक्षाच्या वरीष्ठांनी दिल्याचे समजते. पद कोणालाही मिळो, पण पक्ष म्हणून सर्वांनी एकत्र येण्याऐवजी पक्षद्वेष्ठी भूमिका स्वीकारली. पदाधिका-यांचे असे वागणे पक्षाच्या वृध्दीस पोषक ठरत नाही.

पिंपरी महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना लोकांनी पिंपरीतून आण्णा बनसोडे यांना विधानसभेवर निवडून दिले. आण्णा बनसोडे हे सुध्दा एकला चलोरेच्या भूमिकेत असतात. वेगवेगळे विषय हाती घेऊन प्रशासनाला पत्रके देतात. मात्र, पत्रक देताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नसतो. माजी आमदार विलास लांडे आपल्या संथ भूमिकेवर ठाम असतात. राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आली, दादा उपमुख्यमंत्री-पालकमंत्री झाले. एवढा मोठा सकारात्मक ”प्लॅटफॉर्म” असताना ते शहराचे नेतृत्व करायला तयार नाहीत. साधा पक्षाचा वर्धापन दिन असला तरी पक्षाचे सर्व नगरसेवक पक्ष कार्यालयात एकत्र येऊ शकत नाहीत. आंदोलनात सहभाग घेत नाहीत. कोणीच सक्रीय सहभाग घेत नसल्यामुळे पक्षाची नाव पठाराला लागायची वेळ आली आहे. याचा आगामी महापालिका निवडणुकीत जबरदस्त फटका बसल्याशिवाय राहणार नाही.

स्वतःच्याच वागण्यामुळे पदाधिका-यांची प्रतिमा मलीन

सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे. कोव्हिड परिस्थितीत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत येऊन अधिका-यांची बैठक घेतली. कोव्हिडच्या वॉर रुमला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. युवानेते पार्थ पवार हे सुध्दा आता पिंपरीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी सुध्दा अधिकारी, पदाधिका-यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. कालच त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन कोव्हिड वॉर रुमची पाहणी केली. तेथील प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी कोव्हिड पॉझिटिव्ह आणि कोव्हिड निगेटिव्ह रुग्णांच्या उपचाराची सोय वेगवेगळ्या ठिकाणी करण्याच्या सूचना तेथील व्यवस्थापनाला दिल्या. या भेटी दौ-यात शहरातल्या एकाही पदाधिका-याला बोलवण्यात आले नाही. यावरून यांची पक्षात किती प्रतिमा स्वच्छ राहिली आहे, याचा अंदाज येतो. सर्वच पदाधिका-यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतील तर पक्षवाढीसाठी यांच्याकडून काय आपेक्षा ठेवावी, असा प्रश्न दादांना पडला तर याचे विशेष वाटू नये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button