breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘येस बॅंके’त अडकले 983 कोटी, भाजपच्या दोन्ही आमदारांची आयुक्तांसोबत तातडीची बैठक

  • पैसे सुरक्षित रहावेत, परत मिळावेत यासाठी आमदारांची धडपड
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आरबीआयला पाठविले पत्र

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारतीय रिझर्व बॅंकेने (आरबीआय) येस बॅंकेवर (Yes Bank) नुकतेच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बॅंकेचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यात जमा आहेत. या बॅंकेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुमारे 983 कोटी रुपये अडकले असून ही रक्कम परत मिळविण्यासाठी शर्तीची कसरत करावी लागणार आहे. ही रक्कम सुरक्षितपणे काढून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काल शुक्रवारी (दि. 6) आरबीआयला यासंदर्भात पत्र पाठविले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १६ करसंकलन कार्यालयामार्फत गोळा होणारी रक्कम ऑगस्ट 2018 पासून येस बॅंकेतील महापालिकेच्या खात्यात जमा केली गेली. त्यातच आरबीआयने दोन दिवसांपूर्वी बॅंकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत (दि. 5) येस बॅंकेत जमा झालेले सुमारे 983 कोटी रुपये अडकले आहेत. राष्ट्रीयकृत बॅंकेऐवजी खासगी बॅंकेत करभरणा करण्यास जबाबदार असलेले अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

त्यावर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत आज तातडीची बैठक घेतली. यासंदर्भात चर्चा करून कसा मार्ग काढता येईल, यावर आयुक्तांच्या निवासस्थानी एक तासाहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाली. आयुक्तांनी यावर मार्ग काढण्याचे काही पर्याय सूचविले. येस बॅंकेत असलेली सुमारे 983 कोटी रक्कम सुरक्षितरित्या काढून घेण्यासाठी आरबीआयला पत्र पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी आमदारांना सांगितली. यावर चिंता करण्याचे कारण नसून केवळ महिनाभरासाठीच बॅंकेवर निर्बंध लादले गेल्याचेही आयुक्तांनी आमदारांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button