breaking-newsमुंबई

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अजय देशमुख

  • परीक्षा मंडळाच्या संचालकपदी डॉ. विनोद पाटील यांची नियुक्ती

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या गेल्या जवळपास दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या कुलसचिव आणि परीक्षा मंडळाच्या संचालकपदावर अखेर पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे. डॉ. अजय देशमुख यांची कुलसचिवपदी तर डॉ. विनोद पाटील यांची परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

विद्यापीठाच्या अनेक महत्त्वाच्या पदांचा कारभार गेली दोन वर्षे प्रभारी होता. या वर्षांत कुलगुरू, प्र-कुलगुरू यानंतर कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक ही महत्त्वाची पदे विद्यापीठाने भरली आहेत. कुलसचिवपदी नियुक्ती झालेले डॉ. देशमुख हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलसचिवपदावर कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत होते. परीक्षा मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झालेले डॉ. पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सिस्टीम अ‍ॅनालिस्ट या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी २०१२ आणि २०१३ ही दोन वर्षे ते मुंबई विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत होते.

ऑक्टोबर २०१८ मध्ये या पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. गेल्या आठवडय़ात या दोन्ही पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर या पदांवरील नियुक्तीची घोषणा विद्यापीठाने सोमवारी केली आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिवपद हे राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदासाठी आतापर्यंत मोठय़ा प्रमाणावर अर्ज विद्यापीठाकडे आले होते. यंदा मात्र कुलसचिवपदासाठी ४९ अर्ज आले होते, त्यापैकी २४ उमेदवारांनीच मुलाखत दिली होती. परीक्षा मंडळाच्या संचालकोपदासाठी २९ अर्ज आले होते, त्यातील १८ उमेदवारांनी मुलाखत दिली. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाचे संचालक या पदांवरील नियुक्तीची प्रक्रियाही सध्या सुरू आहे.

कुलसचिवांची नियुक्ती वादात?

नवनियुक्त कुलसचिवांची नियुक्तीही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कुलसचिवांची काही प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असूनही विद्यापीठाने त्यांची निवड कशी केली असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. ‘कुलसचिवांनी चुकीची माहिती दिल्याची तक्रार अमरावती विद्यापीठात झाली होती. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. मात्र तरीही मुंबई विद्यापीठात त्यांची कुलसचिवपदी नियुक्ती होणे योग्य नाही,’ असे संतोष धोत्रे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button