breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदेडमध्ये रविवारच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रविवारच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू करत असल्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केलं आहे.

नांदेड शहरासह जिल्ह्यात करोनाने चांगलाच कहर केला. येथील करोनाबाधितांची संख्या साडेपाचशेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नांदेड यांनी ७ जुलैपासून विविध पथके स्थापन करत प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन होते की नाही, याची चाचपणी केली. दरम्यान, या चाचपणीत निर्देशांचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर करोनाची साखळी तोडण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात काही अटी व शर्तीच्या अधीन राहून टाळेबंदी लागू करणे आवश्यक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून २० जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.

या टाळेबंदीदरम्यान सर्व शासकीय कार्यालये, कर्मचारी, शासकीय वाहने व शासकीय कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, औषधी दुकाने, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, पशुवैद्यकीय दवाखाने, औषधालयांना सूट देण्यात आली. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र वितरक यांनाही सूट दिली आहे.

जिल्ह्यातील रास्तभाव दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत चालू ठेवण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करून आठवडी बाजारात भाजीपाला, फळ विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ७ ते २ या वेळेत घरपोच विक्री करता येईल, दूध विक्रेत्यांना एका ठिकाणी थांबून दूधविक्री करता येणार नाही, त्यांनीही ७ ते २ या वेळेत घरपोच दूध विक्री करावी. शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सेवा द्यावी, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी या आदेशात परवानगी दिली आहे. तसेच शेतीसंबंधित मशागती व खत, बी-बियाणे विक्रीसाठी सकाळी ७ ते २ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button