breaking-newsक्रिडामनोरंजन

महाराष्ट्रातील कुस्तीगिरांना मिळणार मानाचं व्यासपीठ

महाराष्ट्रातील सांस्कृतिक संचिताचा मानबिंदू म्हणजे कुस्ती. अंगात मुरलेली रग, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे नाट्य, प्रतिष्ठा, सन्मान या वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला हा खेळ. मराठी माणसासाठी कुस्ती हा केवळ खेळ नाही, तर छत्रपती शिवरायांशी इमान राखणाऱ्या मर्द मावळ्यांच्या लढवय्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे. एकेकाळी लयाला गेलेल्या या कुस्तीला राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र हे कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बदलत्या कालानुरूप, मातीत खेळला जाणारा हा खेळ आता मॅट वर खेळला जात असला तरी त्यातील थरार कायम टिकून आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी जोखणारा हा खेळ नाट्य, जिद्द, अभिमान,प्रतिष्ठा यांचं एक अफलातून मिश्रण आहे. खाशाबा जाधव यांच्यापासून सुरु झालेली कुस्तीची परंपरा अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदावर आपलं नाव कोरून राहुल आवारेने कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र कुस्ती लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी आपल्या झी टॉकीजवर प्रेक्षकांना मिळणार आहेत. याबद्दल बोलताना झी टॉकीजचे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’च्या माध्यमातून कुस्तीगिरांना एक नवे आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वी विविध लीग्सच्या माध्यमातून कबड्डी आणि क्रिकेट खेळाडूंच्या करिअरला नवी दिशा आणि संजीवनी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र कुस्ती लीगमधूनही गुणी खेळाडूंना अशीच एक मोठी संधी उपलब्ध होईल. या लीगमधील संघमालकी मिळवण्यासाठी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून लवकरच फ्रँचाइजी बिडिंग प्रक्रिया सुरु होईल.’

महाराष्ट्र कुस्ती लीगला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता लाभली आहे. या लीगमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र कुस्ती लीगमुळे कुस्तीला आणि कुस्तीगिरांना  सन्मानाचं आणि यशाचं एक नवं क्षितिज प्राप्त होईल. यामुळे अनेक नव्या दमाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा आपलं नाव सुवर्ण अक्षरात लिहितील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button