महामेट्रोच्या खोदकामात सापडले अज्ञात प्राण्याचे जीवाष्म
पुणे – पुण्यात सध्या शिवाजीनगर ते स्वारगेट या महा मेट्रोच्या मार्गावर खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना मंडई परिसरात अज्ञात प्राण्याचे जीवाश्म सापडले आहेत. आकाराने प्रचंड मोठी असलेले हे जीवाश्म दोन हजार वर्षापूर्वीचे असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बुधवारी (दि.२५) काम सुरू असताना जमिनीपासून दहा मीटर अंतरावर ही हाडे सापडली आहेत.
महामेट्रोचे कर्मचारी काम करत असताना त्यांना सुरुवातीला एक मोठे हाड सापडले. त्यानंतर खोदकाम केले असता आणखी काही हाडे सापडण्यास सुरुवात झाली. या हाडांचा आकार मोठा असून ती हत्ती सदृश्य प्राण्याची असावीत असा अंदाज आहे. दरम्यान ही हाडे अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वीची असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्व खात्यातील तज्ञ व्यक्ती आज या ठिकाणी भेट दिली या हाडांची पाहणी केली त्यानंतर याचे गूढ उकलण्यास मदत होईल.
मात्र हत्तीची हाडे असावीत असा अंदाज पुरातत्व विभाग अधिकारी सांगत आहेत. याचा अभ्यास करून या हाडांबाबत माहीती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर इतिहास अभ्यासकांच्या माहितीनुसार २०० वर्षांपूर्वी या मैदानात सर्कस भरत होती अनेक प्राणी येथे वास्तव्यास होती. त्याच्या इतिहास नोंदी असल्याचे इतिहास तज्ञांनी सांगितले. दरम्यान पुरातत्त्व विभाग या हाडांचा अभ्यास करून माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.