breaking-newsराष्ट्रिय

मराठा समाजाला आरक्षण द्या

  • संसदेत भाजपवगळता सर्वपक्षीय मागणी
  • सरकारने योग्य दखल न घेतल्याने औरंगाबादसारखी परिस्थिती उद्भवली

नवी दिल्ली – भाजपवगळता महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात रेटून लावला. छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेत, तर शिवसेनेचे विनायक राऊत यांनी लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. यात कॉंग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा सुध्दा समावेश होता.

केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेला पक्ष शिवसेनेचे विनायक राऊत यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढविला. महाराष्ट्र सरकार मागील पाच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे. यासाठी न्यायालयाचा वापर ढाल म्हणून केला जात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

मराठा समाज अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करीत आहे. अख्ख्या जगाने याची दखल घेतली आहे. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यामुळे औरंगाबादसारखी परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप सिंधुदुर्गचे खासदार राऊत यांनी केला.

खासदार संभाजी छत्रपती यांनी आरक्षणाचा मुद्या राज्यसभेत मराठीतून रेटून लावला. छत्रपती संभाजी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला भारतात पहिल्यांदा आरक्षण दिले होते. आरक्षण मिळालेल्या समाजामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांच्यासोबत मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी अनेक मोर्चे निघाले. या मोर्चांची दखल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही घेतली गेली. मात्र आज परिस्थिती बिघडली आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.

सध्या पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संभाजी राजेंनी दोन उपाय सूचवले आहेत. ते म्हणाले, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मराठा समाजातील घटकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात. दुसरी माझी मागणी म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलावून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय महाडिक म्हणाले की, मागील 2-3 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारी दरबारी आपले कुणी ऐकणारे नसल्यामुळे निराश झालेल्या काकासाहेब शिंदे नावाच्या युवकाने गोदावरीत उडी मारली असल्याचेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button