मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा मोर्चातून काढता पाय

सातारा – आज मराठा क्रांती मोर्चाकडून साताऱ्यात मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत आमदार शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले होते. त्यावेळी रॅलीला उद्देशून बोलताना आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रॅलीत भाषण न करता आल्याने आमदार शिवेंद्रराजे यांना काढता पाय घ्यावा लागला. या आंदोलनात मराठा आंदोलकांकडून सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांना दूर ठेवण्यात येत आहे. तर स्थानिक नेत्यांबद्दलचा रागही व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे बॅनर लिहून साताऱ्यात रॅली काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते. एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत आंदोलकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या रॅलीदरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाषण आंदोलकांना उद्देशून भाषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना भाषण करण्यास विरोध केला. तर आंदोलनात गप्प राहण्याची नामुष्की शिवेंद्रराजेंवर ओढवली. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी रॅलीतून काढता पाय घेतल्याचे समजते. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून मोर्चे काढण्यात येत आहेत. जवळपास सर्वच ठिकाणी आंदोलकांकडूनच स्थानिक नेत्यांना विरोध होत आहे. तर गेवराईचे येथे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घर व कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दगडफेक केली.