breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्राध्यापकांच्या निम्म्या जागा रिक्त

अध्यापन, संशोधनासह कामकाजावर परिणाम

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीत आपले स्थान उंचावणाऱ्या, राज्यातील आघाडीचे विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या मान्य पदांपैकी जवळपास निम्म्या जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, संशोधन, कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना प्राध्यापकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. या मुदतीत रिक्त जागा न भरल्यास अनुदान रोखण्याची कारवाई केली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर आढावा घेतला असता, विद्यापीठातील तब्बल १७८ जागा रिक्त असल्याचे आढळून आले. विद्यापीठात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या मिळून ३८६ मान्यताप्राप्त जागा आहेत. सद्यस्थितीत केवळ २०८ जागाच भरण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. उर्वरित १७८ रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाला कंत्राटी, गेस्ट फॅकल्टी, व्हिजिटिंग फॅकल्टीच्या स्वरुपात प्राध्यापकांना बोलवावे लागते. त्याचा आर्थिक भार विद्यापीठावर पडतो. त्याशिवाय मान्य जागांपैकी काही प्राध्यापक संशोधनाच्या कामामुळे उपलब्ध होत नाहीत. या सर्व कारणांमुळे अध्यापनापासून अन्य कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे. तसेच संशोधन, क्रमवारीत स्थान उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठीही मर्यादा येत आहेत. अद्याप सरकारकडून रिक्त जागा भरण्यासाठी मान्यता मिळालेली नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातही प्राध्यापकांच्या अनुपलब्धतेनेच करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारने महाविद्यालयांना प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिली आहे. त्या धर्तीवरच विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने मान्यता देण्याची आवश्यकता आहे. या बाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.    – डॉ. प्रफुल्ल पवार,  कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

जवळपास २० विभागांना प्रमुखच नाहीत

प्राध्यापकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्याने विद्यापीठातील जवळपास २० विभागांमध्ये विभाग प्रमुख नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. इंग्रजी, तत्त्वज्ञान, बुद्धिस्ट स्टडी सेंटर, इंग्रजी, पर्यावरणशास्त्र आदी विभागांमध्ये अतिरिक्त कार्यभार पद्धतीने कामकाज करावे लागत आहे.

सहा विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही

विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण, राष्ट्रीय सेवा योजना, इन्स्ट्रुमेन्टेशन सायन्स, आंतरप्रणाली अभ्यास केंद्र (मानव्यता आणि सामाजिक शास्त्रे), आंतरप्रणाली अभ्यास केंद्र विज्ञान, पर्यावरणशास्त्र सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक प्राध्यापक पद मंजूर आहे. मात्र, या सहाही विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button