breaking-newsपिंपरी / चिंचवड

मराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरा करण्यात आला.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार व सहकाऱ्यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, साहित्यिक श्रीधर आरबुने पाटील, डॉ. दिनेश गाडेकर, नितीन चिलवंत, किसन फसके, मराठवाडा जनविकास संघांचे सचिव सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, बळीराम माळी, रेखा दूधभाते, संतोष पाटील, शंकर तांबे, आण्णा जोगदंड, शंकर मुसांडे, राजेंद्र मोरे, किशोर अटरगेकर आदी उपस्थित होते.

साहित्यिक श्रीधर पाटील यांनी “प्रवास” या त्यांच्या कवितेतून मनोगत व्यक्त केले. डॉ. दिनेश गाडेकर यांनी हुतात्म्यांच्या आठणींना उजाळा देत, सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वानी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाला न घाबरता सर्व नियमांचे पालन करत काळजी घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.

दरम्यान, मराठवाडा कलाकार संघातील गायक शंकर मुसांडे, गायिका अंजली सारस्वत, हार्मोनियम राजेंद्र मोरे आणि तबलावादक रवी सारस्वत यांनी अभंगवाणी आणि देशभक्तीपर गीते गायिली.

अरुण पवार म्हणाले, की भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतात सहाशे ते सव्वासहाशे संस्थानिक होते. त्यानंतर जवळजवळ सर्वच संस्थानिक स्वतंत्र भारतात विलीन झाले. पण निजामाचा स्वतंत्र भारतात विलीन होण्याला नकार होता. मराठवाडा हा 16 जिल्ह्यांचा मोठा प्रदेश होता. जर मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालाच नसता, तर मध्य भारताच्या पोटात पुन्हा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा एक भारतासाठी मोठा धोका होता. म्हणून मराठवाड्यातील लोकांनी लढे उभारले, संघर्ष केला, बलिदान दिले. त्यामुळे मराठवाडा भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिन्याने स्वतंत्र झाला. आणि भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त झाला.

नितीन चिलवंत म्हणाले, ‘मराठवाड्याची मुक्तता’ असे म्हणण्यापेक्षा निजाम राज्यातून स्वतंत्र होणे, ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. स्वामी रामानंद तीर्थ, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे अशा अनेकांनी मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे. निजामाच्या तावडीतून हा प्रदेश मुक्त झाला पाहिजे, यासाठी लढा उभारला. त्यांच्यामुळेच मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन होऊ शकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन भरगंडे यांनी, तर नितीन चिलवंत यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button