breaking-newsआंतरराष्टीय

भारतासाठीच्या पहिल्या राफेल विमानाच्या फ्रान्समध्ये चाचण्या सुरू

खास बदल केलेली विमाने मिळण्यास मात्र २०२२ पर्यंत प्रतीक्षा

भारतीय हवाईदलाला पुरवण्यासाठीचे पहिले राफेल विमान तयार झाले असून त्याच्या फ्रान्समध्ये चाचण्या सुरू आहेत. मात्र भारताने सुचवलेल्या सर्व प्रकारच्या सुधारणा केलेले राफेल विमान एप्रिल २०२२ मध्ये, म्हणजे कराराची मुदत संपल्यानंतर मिळणार आहे.

भारताने फ्रान्सबरोबर केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारानुसार त्यात १३ प्रकारचे खास भारतासाठीचे बदल (इंडिया-स्पेसिफिक एन्हान्समेंट्स) करण्यात येणार आहेत. त्यात रडारची क्षमता वाढवणे, वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्यांसंबंधी माहिती दिसणे, टोड डेकॉय यंत्रणा, लो बँड जॅमर, रेडिओ अल्टिमीटर आणि अतिउंच वातावरणात विमान वापरता येण्याची क्षमता आदी बाबींचा समावेश आहे. या सोयी मूळ फ्रेंच विमानात नाहीत. राफेल विमानावर हे बदल कार्यान्वित करून त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यास करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ६७ महिन्यांचा कालावधी (म्हणजे एप्रिल २०२२ पर्यंतचा काळ) लागणार आहे. सध्या भारतासाठीचे पहिले विमान तयार झाले असून त्यावर हे बदल करून त्यांच्या चाचण्या घेण्यास फ्रान्समध्ये सुरुवात झाली आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी भारतीय हवाईदलाच्या ४ अधिकाऱ्यांचे पथक ऑगस्ट २०१७ पासून फ्रान्समध्ये दाखल झाले आहे.

दरम्यानच्या काळात फ्रान्स भारताला सप्टेंबर २०१९ पासून भारतासाठीचे खास बदल न केलेली मूलभूत विमाने पुरवण्यास सुरुवात करेल. या विमानांवर भारतात आणल्यानंतर विशेष बदल केले जातील. मात्र हे बदल योग्य प्रकारे होण्यासाठी सर्वप्रथम उत्पादन झालेल्या विमानावर त्यांचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे भारताला २०२२ पर्यंत ३५ मूलभूत स्वरूपातील विमाने मिळतील. आता सर्वप्रथम तयार झालेले विमान संपूर्ण बदल करून, त्यांचे प्रमाणीकरण करून सर्वात शेवटी मिळेल. त्यानंतर भारतात पोहोचलेल्या ३५ विमानांवर खास बदल करण्यास सुरुवात होईल. त्याला केवळ ५ महिने लागतील. याचा अर्थ मूलभूत स्वरूपातील राफेल विमाने भारताला सप्टेंबर २०१९ पासून मिळण्यास सुरुवात झाली तरीही भारताला हव्या असलेल्या बदलांसह राफेल विमाने एप्रिल २०२२ नंतरच (कराराचा कावधी संपल्यानंतर) उपलब्ध होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button