breaking-newsपिंपरी / चिंचवड

भाजपची नौटंकी, महाविकास आघाडीवरील आरोप बिनबुडाचे

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्याचाराच्या घटना रोखण्यास तत्पर
  • शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांचा संताप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली. एकीकडे महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना, सत्ताधारी भाजप त्यावेळी महाजनादेश यात्रा काढण्यात मश्गुल होते. यांच्या अशा वृतीतून असंवेदनशीलपणा दिसून येतो. यांना जनतेचे काहीही देणे घेणे नाही. यांना महिलांच्या सुरक्षेची काळजी नाही. भाजपचा कल्याणचा तत्कलीन उपाध्यक्षाने त्यावेळी लहान मुलीवर अत्याचार केले. या पक्षातील पदाधिकारीच असे कृत्य करीत असतील तर, भाजप पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार हे जनतेला कळाले होते. सत्ता असताना महिलांसाठी कोणताही ठोस निर्णय न घेतलेला हा पक्ष केवळ तीन महिने कारभार हाकणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवरला प्रश्न विचारत आहे. विरोधी पक्ष म्हणूनही या पक्षाला व्यवस्थित भूमिका निभावता आलेली नाही. कोणत्याही गोष्टीचे तारतम्य न बाळगता, ‘सुतावरून स्वर्ग गाठत’ नौटंकी केली जात आहे, असा आरोप शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक व महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी भाजपवर केला आहे.

या प्रसिद्धीपत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर भाजपने राज्यातील व हिंगणघाट घटनेवरून तसेच पिंपरी चिंचवड शहरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकाच्या विरोधात धरणे आंदोलन केले. मात्र, तत्कालीन भाजपच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळातच राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाली, गुन्हे रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणातही सरकार पूर्णपणे नापास झाले. परंतु, राज्याच्या सत्तेवर आरूढ झालेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन केवळ तीन महिने पूर्ण झाली आहेत. मात्र, भाजपने शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारला राज्यातील महिला अत्याचार व हिंगणघाट घटनेला ग्राह्य धरत दुषणे द्यायला सुरुवात केली आहे. हा आजवरचा सर्वात मोठा विनोद म्हणावा लागेल. महाराष्ट्रात मुलांच्या अपहरणाच्या गुन्हांतही भाजपच्या सत्ताकाळात वाढ झाली. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ ही घोषणा या सरकारने केली, त्याच्या जाहिरातीसाठी स्वत: च्या छायाचित्रांचे पोस्टर देशभर लावले. पण एकाही पोस्टरवर त्याअंतर्गत असलेल्या कायद्याची आणि गुन्ह्यांची माहिती जनतेला दिली नाही. ९२८ कोटी रुपयांची तरतूद या योजनेवर सरकारने केली, त्यातील फक्त १९ टक्के निधी राज्याला मिळाला आणि ४० टक्के निधी जाहिरातीवर खर्च केला. हे सरकार जाहिरातबाजी आणि घोषणाबाजीतच रमले.

भाजपने उन्नाव प्रकरणातील पक्षातीलच ज्येष्ठ नेत्याचे नाव येऊनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आणि अटक करण्यात विलंब का केला, याचे उत्तर जनतेला द्यावे. गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ का, याचे उत्तर भाजपाने देशाला द्यावे. कुलदीप सिंग सेनगर या भाजपच्या आमदारांच्या कृपेने एरवी शांत असलेल्या उन्नावला देशाच्या नकाशावर भयावह बलात्कार झालेले ठिकाण म्हणून स्थान मिळाले. जम्मू काश्मिरमध्ये कठुआ येथे निरागस बालिकेचा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्या माणसांची भाजपच्या राज्यातील मंत्र्यांनी बाजू घेतली. त्यांच्या समर्थनार्थ मिरवणुका काढल्या. राज्यातही यासारख्या असंख्य घटना घडल्या. त्यावेळी फडणवीस सरकार काय करीत होते. भाजपचा शहरातील एक राज्यसभा खासदार व चिंचवड व भोसरीचे आमदार त्यावेळी काय दिवे लावीत होते. त्यावेळी या घटनांबद्दल भाजपच्या या लोकप्रतिनिधींकडून एक चकार शब्दही ऐकिवात नाही. आताच का या लोकप्रतिनिधींना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला अत्याचारचा पुळका आला? की महापालिका सत्तेवर गडांतर येते, निविदा रद्द होतात म्हणून दबावतंतत्राचा भाग म्हणून आंदोलन करायचे हे आधी भाजपने ठरवावे. कारण वरील उदाहरणावरून भाजपची महिला अत्याचाराबाबतची तळमळ दिसून येतच आहे. तुमचे लबाड धंदे जनतेपासून लपून राहिलेले नाहीत. त्यामुळेच सरकार बरखास्तीचे व शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामा मागण्याचे नैतिक अधिकार तुम्हाला नाहीत.

बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक राज्यातील व पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक माता-भगिनींची रक्षा करण्यास सदैव तत्पर आहे. बाळासाहेबांची तशी शिकवणच आहे. ही बाब भाजपने प्रथम लक्षात घ्यावी. हिंगणघाटमधील घटना कौर्याची परिसीमा गाठणारीच आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा होईल. असं कृत्य करण्याचं धाडस पुन्हा होणार नाही, असा कायदा करु. मात्र, नागरिकांनी संयम बाळगावा. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी शक्य तितक्या जलद गतीने प्रयत्न करावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना सरकारने गतीमान केले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, भाजपला या मुद्द्यावरून केवळ राजकारण करायचे आहे. “राज्यात पाच वर्ष सत्ता होती. तेव्हा काय गोट्या खेळत होता का, त्यावेळी का या गंभीर प्रश्नांसाठी तुम्ही काही केलं नाही. सत्ता असताना काही केलं नाही, मग आता कशाला नौटंकी करता.” गेल्या ५ वर्षांत अच्छे दिनसाठी खोट कोणकोण बोलल, याचे उत्तर जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे भाजपचा विरोध केवळ कातडीबचाव आहे. राज्यातील व महापालिकेतील घोटाळे बाहेर येऊ नयेत, यासाठी भाजप या अशा नौटंकी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करीत आहे, हे आधी थांबवा. अन्यथा शिवसैनिक आतून पेटल्यास तुम्हाला पाळता भुई थोडी होईल, असा इशारा या पत्रकाद्वारे शिवसेनेच्या सौंदणकरांनी भाजपला दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button