breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपची अवस्था: “पायलीचे पंधरा, अन् अधोलीचे सोळा”; पण मंत्र्याच्या स्वागताचे भान एकासही राहिना

  • भाजपच्या प्रोटोकॉलवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
  • पक्षांतर्गत व्यक्त केली जातेय शोकांतिका

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अतिमहत्वाचे स्थान आहे. त्यांच्या हस्ते पिंपरीतील एचए मैदानावर आयोजित असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चर असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय फुलांच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. मात्र, त्यांच्या स्वागताला पिंपरी-चिंचवड भाजपचा एकही नेता अथवा पदाधिकारी पुढे आला नाही, ही सर्वात मोठी भाजपची शोकांतिका वर्तविली जात आहे. शहरात एक राज्यसभा खासदार, दोन आमदार आणि महामंडळावरील दोन राज्यमंत्री दर्जाची पदे भोगत असलेल्या पदाधिका-यांचा लवाजमा असताना यातील एकालाही पुढे येऊन मंत्र्यांचे स्वागत करावे, असे वाटले नाही. त्यामुळे भाजपने सुरूवातीला प्रोटोकॉलच्या नावाने जो टाहो फोडला, तो हाच का प्रोटोकॉल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

एखादी जाहिरात प्रसिध्द करायची असेल तर कट्टर भाजपच्या पदाधिका-यांसह “जंपींग ग्राऊंड” केलेल्या भाजपवासियांनी सुध्दा प्रोटोकॉलचा धडा सर्वसामान्यांना शिकविला. त्या प्रोटोकॉलप्रमाणे भाजपचा कारभार चालतो, असे म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत पंधरा वर्ष वेगवेगळी पदे भोगून भाजपवासीय झालेले पदाधिकारी सुध्दा गोंधळात सापडले होते. येथे भलतेच काहीतरी चालते, असा त्यांचा समज झाला होता. मात्र, ते भलते-सलते काहीही नसून एकंदरीत सावळा गोंधळ चालतो, हे आजच्या मंत्री महोदय मुनगंटीवार यांच्या कार्यक्रम सोहळ्यात स्पष्ट झाले आहे. पिंपरीतील एच. ए. मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चर असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय फुलांचे तीन दिवसीय प्रदर्शन भरविले आहे. त्याचे उद्घाटन मंत्री मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते झाले. राज्याचा आर्थभार सांभाळणारे मंत्री शहरात येणार म्हटल्यावर त्यांचा राजशिष्टार जपणे भाजप पदाधिका-यांचे अद्य कर्तव्य असते. मात्र, त्यांच्या स्वागतला भाजपचा एकही स्थानिक पदाधिकारी अथवा कार्यकर्ता पुढे आला नाही. ही शोकांतिका कार्यक्रमात दिसून आली आहे. त्यामुळे स्थानिक भाजपची अवस्था म्हणजे पायलीचे पंधरा अन् अदोलीचे सोळा, परंतु एकालाही वेळ मिळेना, अशी झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे अशा प्रमुख नेत्यांची फौज आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. तसेच, दोन दिवसापूर्वी, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर स्मार्ट सिटीच्या विदेश दौ-यावर आहेत. तरी, शहरात महापौर राहूल जाधव, खासदार साबळे, आमदार लांडगे, अध्यक्ष खाडे आणि पटवर्धन यांच्यासह 80 नगरसेवक तसेच पक्षाची तगडी कार्यकारिणी आहे. तथापि, यातील एकालाही मंत्री मुंनगंटीवार यांचे स्वागत करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे भाजपच्या शिष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपचा हाच का तो प्रोटोकॉल, असा सवाल नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. याबाबत विचारणा केली असता सरचिटणीस अमोल थोरात यांनाही याची माहिती नसल्याचे सांगितले. तर, प्राधिकरणाचे अध्यक्ष कामानिमित्त साता-यात असल्याची माहिती मिळाली. शिवाय, मुनगंटीवार शहरात येणार असल्याची माहिती केवळ अन् केवळ सरचिटणीस प्रमोद निसळ यांना होती, असे भाजपचे मोठे पदाधिकारी सांगत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button