breaking-newsराष्ट्रिय

बेदी यांच्या ‘ट्वीट’वर लोकसभेत गोंधळ

पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या ट्विट संदेशावरून लोकसभेत बुधवारी गोंधळ झाला. बेदी यांच्या विधानाला आक्षेप घेत विरोधी  सदस्य हौद्यात जमले. द्रमुकचे सदस्य टी.आर. बालू यांनी किरण बेदी यांच्या विधानाला आक्षेप घेत टीका केली.

तामिळनाडूतील राजकीय नेते व अधिकारी भ्रष्ट आहेत त्यामुळेच २०१५ मध्ये पुराचा अनुभव घेणाऱ्या चेन्नईवर पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली, असा ट्विट संदेश किरण बेदी यांनी हिंदीतून टाकला होता. या मुद्दय़ावर प्रथमच विरोधकांत एकी दिसून आली व त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या  आसनासमोर एकत्र येऊन निषेध केला.

द्रमुकचे नेते बालू यांनी किरण बेदी यांच्या ट्विटचा उल्लेख करून सांगितले की, यातून राज्यातील खासदारांची अवहेलना झाली आहे. इतर राज्यांतील नेत्यांवर किरण बेदी यांना नायब राज्यपाल असताना टीका करण्याचा अधिकार नाही,  त्यामुळे सरकारने यावर उत्तर द्यावे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बालू यांच्या वक्तव्यावर हस्तक्षेप करून सांगितले की, किरण बेदी या घटनात्मक पदावर असून बालू यांनी त्यांचे म्हणणे लेखी द्यावे. बालू यांचे त्यावर समाधान झाले नाही व त्यांना इतर खासदारांनीही पाठिंबा दिला.

द्रमुकचे खासदार तसेच आपचे खासदार भगवंत मान यांनी बालू यांचे समर्थन केले. मान यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी बातचित केली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, या प्रश्नावर शून्य प्रहरात चर्चा करता येणार नाही. बेदी या घटनात्मक पदावर असल्याने त्यासाठी प्रस्ताव देऊनच चर्चा केली जाऊ शकते. संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी सांगितले की, विरोधकांनी गरज वाटल्यास यावर चर्चेसाठी प्रस्ताव सादर करावा. शून्य प्रहरात तृणमूल काँग्रेस व भाजप खासदारात शाब्दिक चकमक झाली. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी सांगितले की, लोकसभेला  पश्चिम बंगाल विधानसभेचे रूप देऊ नका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button