breaking-newsपुणेमहाराष्ट्र

काँग्रेसमधील गटबाजीला उधाण

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपुष्टात आल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसमधील गटबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट दिवसेंदिवस तिला उधाणच येत असल्याचे चित्र आहे. याच गटबाजीतून सध्या शहराध्यक्ष बदलण्याबाबतची मोहीमच काही पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे. त्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनलबेन पटेल यांच्याकडे मागणी केल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षातील धुसफूस चव्हाटय़ावर येण्याची शक्यता आहे.

विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यानंतर शहराध्यक्ष पदाची धुरा माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्याकडे देण्यात आली. पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. मात्र अंतर्गत वाद सातत्याने पुढे आले. पक्षाचा शहराचा कारभार काही मूठभर लोकांच्या ‘हाता’मध्ये असल्याचे आरोप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून सुरू  झाले.

काही मोजक्या लोकांकडून निष्ठावंतांना डावलले जात आहे, विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार सातत्याने करण्यात येत होती. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा सातत्याने करण्यात येत होता. पण, हा दावा काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष बदलाबाबत केलेल्या तक्रारीमुळे फोल ठरला आहे. माजी नगरसेवक शिवा मंत्री, सदानंद शेट्टी, मुक्तार शेख यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी सोनलबेन पटेल यांच्याकडे त्याबाबतची मागणी केल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे.

विधानसभेसाठी वैयक्तिक स्पर्धा तीव्र

शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचे सांगितले जात असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वैयक्तिक स्पर्धा तीव्र झाली आहे. पर्वतीमध्ये प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि नगरसेवक, माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. शिवाजीनगरमध्ये माजी आमदार दीप्ती चवधरी आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्यातील स्पर्धा संघर्ष यात्रेच्या निमित्तानेही पुढे आली. कसब्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काँग्रेसमध्ये आलेले रवींद्र धंगेकर, महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे आणि रोहित टिळक यांच्यात एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. हडपसरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि शिवाजी केदारी यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पुणे कॅन्टोन्मेंटमधून सदानंद शेट्टी आव्हान देत आहेत.

काँग्रेसच्या राज्याच्या प्रभारी सोनलबेन पटेल यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. शहर काँग्रेससंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. मात्र, शहराध्यक्ष बदलाबाबत मागणी करण्यात आली नाही, असा दावाही त्यांनी केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button