breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पुलांची दुरुस्ती कमी दरात

६७.६३ कोटींऐवजी ५५.६३ कोटींमध्ये कामे; पालिकेच्या अंदाजात घोळ की दर्जात तडजोड?

अंधेरी येथील पादचारी पूल दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिकेने पश्चिम उपनगरांतील काही पूल आणि स्कायवॉकच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी खर्चाबाबत निश्चित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत १३ ते २८ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांच्या झोळीत ही कामे टाकण्याची तयारी पालिकेने केली आहे. परिणामी, पालिकेची खर्चाचा अंदाज घेण्याची पद्धत, कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा यावरून वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. हे प्रस्ताव मंजुरीसाठी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार असून याबाबत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

अंधेरी येथील उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वेमार्गावर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईमधील पुलांची पाहणी करीत त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला. दहिसर, कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, वांद्रे परिसरांतील उड्डाणपूल आणि आकाशमार्गिकांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेत १३ ते २८ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंत्राटदारांना ही कामे देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.

कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागांतील पुलांच्या दुरुस्तीची सुमारे ४७ कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी १६ कोटी ३८ लाख ४० हजार ५३२ रुपये खर्च येईल, असा पालिका अधिकाऱ्यांचा अंदाज होता. निविदेमध्ये तसा उल्लेख करण्यात आला होता. मात्र या कामांसाठी २५.२० टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एम. ई. इन्फ्राप्रोजेक्टस् कंपनीची प्रशासनाने निवड केली आहे. प्रशासन आता कंत्राटदाराकडून हे काम १२ कोटी ७४ लाख ५४ हजार ८२७ रुपयांमध्ये करून घेणार आहे.

पावसाच्या तडाख्यात दहिसर येथील सी. एस. लिंक रोड येथील उड्डाणपुलावर खड्डे पडले असून त्यामुळे या उड्डाणपुलाचे पुनर्पृष्ठीकरण करण्याची शिफारस स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने केली आहे. समितीच्या शिफारशीनुसार प्रशासनाने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबविली होती. या कामासाठी १२ कोटी ७८ लाख १३ हजार ५५४ रुपये अंदाजित खर्च येईल, अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र निविदा प्रक्रियेत १६.२० टक्के कमी दराने निविदा सादर करणाऱ्या ‘अस्फाल्ट इंडिया कॉर्पोरेशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’ला हे काम देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. ही कंपनी ११ कोटी १३ लाख ९२ हजार ०७२ रुपयांमध्ये हे काम करणार आहे.

सल्लागाराने केलेल्या शिफारशीनुसार प्रशासनाने गोरेगाव आणि मालाड भागांतील स्कायवॉकची दुरुस्ती करण्याचे ठरविले असून या कामांसाठी १८ कोटी ३१ लाख ८७ हजार ०१४ रुपये अंदाजित खर्च प्रशासनाने निश्चित केला होता. मात्र तब्बल २८.५० टक्के कमी दराने निविदा सादर करणाऱ्या एम. ई. इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या झोळीत १३ कोटी ६२ लाख १७ हजार ८६४ रुपयांचे काम टाकण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. अंधेरी, वांद्रे परिसरांतील उड्डाणपूल खड्डेमय झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या. निविदांमध्ये या कामांसाठी २० कोटी १४ लाख ७७ हजार ८४५ रुपये अंदाजित खर्च नमूद केला होता. मात्र १३.५० टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एम. ई. इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला १८ कोटी १२ लाख ४९ हजार ४७० रुपयांचे काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अंदाज चुकला?

एखाद्या कामाचे कंत्राट देण्यापूर्वी त्यासाठी लागणारे साहित्य, त्याचा बाजारभाव आणि अन्य आवश्यक गोष्टींचा पालिका अधिकारी अभ्यास करतात. अभ्यासाअंती कामासाठी येणारा खर्च निश्चित केला जातो. चारही कामांसाठी पालिका अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ६७ कोटी ६३ लाख १८ हजार ९४९ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या तुलनेत कंत्राटदारांनी ५५ कोटी ६३ लाख १४ हजार २३३ रुपयांमध्ये ही कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र अधिकाऱ्यांचा अंदाजित खर्च योग्य असेल तर कमी दरात करण्यात येणाऱ्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. जर कंत्राटदारांनी नमूद केलेल्या दरात दर्जेदार काम झाल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असा आक्षेप नगरसेवकांनी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button