breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जम्बो हॉस्पिटल की मृत्यूचा सापळा…महाविकास आघाडी सरकारची चमकोगिरी : भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक

जंबो हॉस्पिटलचा 89 कोटींचा पांढरा हत्ती पुणेकरांवर लादूनही मिळेनात उपचार

पुणे | प्रतिनिधी

मोठा गाजावाजा करुन महाविकास आघाडी सरकारने पुण्यात जंबो हॉस्पिटलची उभारणी केली. प्रत्यक्षात ते 26 ऑगस्टला सुरु झाले. आपण स्वतः या रुग्णालयाचे उद्घाटन केले. मात्र पुरेशी व्यवस्था नसतानाच केवळ काम करत असल्याचा दिखावा निर्माण करण्यासाठीच हे उद्घाटन गडबडीने घडवून आणले, असे आता दुर्दैवाने म्हणावे लागते आहे. कोरोनाच्या संकट काळातसुद्धा कार्यक्षमतेचा दिखावा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने केलेली ही घाई पुणेकरांच्या जीवाशी खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्यक्षात जंबो हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य पुणेकरांच्या वाट्याला काय यातना येत आहेत याची खबर आपणास नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे .

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे . सरकारच्या वतीने कृपया पुढील प्रश्नांचा खुलासा जनतेपुढे केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

1) तब्बल सहाशे ऑक्सिजन बेड आणि दोनशे व्हेंटीलेटरचे जंबो हॉस्पिटल अल्पावधीत उभारल्याबद्दल सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण सुरु होऊन आठवडा झाला तरी या सहाशेपैकी किती बेड प्रत्यक्षात सुरु आहेत याची माहिती द्यावी. यातले निम्मेदेखील बेड सुरु नसल्याच्या तक्रारी पुणेकर सातत्याने करत आहेत.

2) जंबो हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट लाईफलाईन या संस्थेला दिल्याचे समजते. या संस्थेने आजघडीला या हॉस्पिटलसाठी किती डॉक्टर, नर्स व अन्य आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे याची माहिती द्या. आठशे ऑक्सिजन-व्हेंटिलेटरयुक्त खाटा चालवण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का हेही जनतेला सांगा. 

3) जनतेच्या ताब्यातून उभारलेले जंबो हॉस्पिटल लाईफलाईन नावाच्या खासगी संस्थेच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्यावर विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त यांचा कोणाचाच वचक नसल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट झाले आहे. रुग्णांना उपचारासाठी भरती न करुन घेणे, भरतीसाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत ठेवणे, निरनिराळ्या कागदपत्रांच्या अडचणी सांगून परत पाठवणे अशा तक्रारी पुणेकर करत आहेत. परिणामी जंबो हॉस्पिटलची अवस्था ‘भीक नको, कुत्रे आवर’ अशी झाली आहे. सर्वसामान्य माणसाला जंबो हॉस्पिटलमध्ये उपचारसुद्धा मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. जंबो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून या ठिकाणच्या सहाशे खाटा भरल्या का याचे उत्तर द्यावे.

4) शहरातल्या इतर हॉस्पिटलवरचा ताण जंबो हॉस्पिटलमुळे कमी व्हायला हवा होता. परंतु, जंबो हॉस्पिटलमधल्या असंवेदनशील व्यवस्थेमुळे येथील बेड रिकामे राहात आहेत. रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करुन खासगी व अन्य सरकारी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. याची जबाबदारी कोण घेणार?

5) खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडत नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना परत पाठवले जात असल्याच्या संतापजनक घटना अलिकडच्या काही दिवसात घडल्या आहेत. सर्वसामान्यांना उपचार नाहीत आणि जंबो हॉस्पिटलमधल्या खाटा रिकाम्या, अशी स्थिती असेल तर मग हे जंबो हॉस्पिटल कंत्राटदारांना पोसण्यासाठी उभारले आहे का, हेही पुणेकरांना एकदा सांगून टाका. सर्वसामान्य पुणेकरांना हेलपाटे न घालता जंबो हॉस्पिटलमधील सुविधांचा लाभ मिळणार आहे की नाही? असे सवाल जगदीश मुळीक यांनी उपस्थित केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button