breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड विरोधी पक्षनेतापदी नाना काटे यांचे नाव निश्चित, मयूर कलाटे चिंचवड विधानसभेचे उमेदवार?

राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी : आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्‍हान देण्याची तयारी

वार्तापत्र : चिंचवड विधानसभा-२०१९

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभेचे भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्‍हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांना महापालिका विरोधी पक्षनेतेपदी संधी देण्यात येईल. तसेच, नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे यांना विधानसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीअंतर्गत खलबते सुरू झाली आहेत.

नगरसेवक नाना काटे यांना महापालिका कामकाजाचा तगडा अनुभव आहे. तसेच, शांत- संयमी परंतु प्रसंगी आक्रमक भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणून नाना काटे यांची ओळख आहे. विशेष म्हणजे, आयटीयन्स आणि सोसायटींमध्ये राहणारा शिक्षीत मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार आहे. पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रु सोसायटीच्या प्रभागातून राष्ट्रवादीची पताका नाना काटे यांनी अभिमानाने फडकावली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनी आयटीएन्स आणि सोसायटीमधील मतदारांची नस ओळखली आहे. त्याचा फायदा पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी नाना काटे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा ‘प्लॅटफॉर्म’ मिळाला पाहिजे, असा आडाखा बांधला जात आहे. त्याहून पुढे नाना काटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात गतवेळी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदाही पक्षाला होणार आहे. मात्र, नाना काटे यावेळीसुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यास तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी आता युवा चेह-यांना संधी देण्यात येईल, असे वारंवार ठणकावून सांगीतले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदार संघातून नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य मयूर कलाटे यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात ‘जायंट किलर’ म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. वास्तविक, चिंचवडमध्ये आमदार जगताप म्हणजे  सध्यस्थितीला ‘शेहनशहा’ आहेत. त्याच्या विरोधात मैदानात उतरण्याचे धाडस कुणासाठीही राजकीय ‘रिस्क’ आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी तेच अधोरेखित करते. तरीही राष्ट्रवादीचे नाना काटे आणि मयूर कलाटे यांनी दंड थोपाटले आहेत. मयूर कलाटे यांच्या समर्थकांनी ‘सोशल मीडिया’वर चिंचवड विधानसभेचे ‘भावी युवा आमदार’ असे ‘ब्रँडिंग’ सुरू केले आहे. त्यामुळे मयूर कलाटे विधानसभेच्या तयारीला लागले काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

***

वाकडचे कलाटे बंधू आता एक होणार काय?

शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि नगरसेवक मयूर कलाटे हे नात्याने बंधू लागतात. दोघांनीही आपआपल्या पक्षात स्वत:ची ‘स्पेस’ निर्माण केली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात दोघांनीही रान तापवले आहे. युती किंवा आघाडीचे समीकरण फिस्कटले तर राहुल कलाटे हेच आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्‍हान देणारा चेहरा आहेत. त्यांनी गतवेळी शिवसेनेकडून विधानसभा लढवली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या मोहीमेद्वारे मयूर कलाटे यांनी जगताप यांच्याविरोधात मोट बांधली आहे. तसेच, राहुल कलाटे यांनीही जगताप यांच्यावर नाराज असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे समर्थन मिळवले आहे. सांगवीचे एक नगरसेवक तर, पक्ष कोणताही असो… माझा उमेदवार राहुल कलाटे…अशा भूमिकेत आहेत. वास्तविक, दोन्ही कलाटे बंधू एकत्र आल्यास जगताप यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. त्यासाठी गावकी-भावकीचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. यावर आगामी काळात नेमके कोणते चित्र पहायला मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button