पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद
पिंपरी महाईन्यूज
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.1) पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी (दि.2) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी सह शहरअभियंता प्रवीण लडकत यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.1) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.2) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.