breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पत्नीच्या मृत्यूनंतर मुलाचा सांभाळण्यास नकार, 68 वर्षीय व्यक्तीने निवडला गुन्हेगारीचा मार्ग

अंधेरी रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडून टीसी असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्या 68 वर्षीय व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद मेहता असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नोकरी गेल्यामुळे आणि मुलाने आपला सांभाळ करण्यास नकार दिल्यानेच आपण हा मार्ग निवडला असल्याचं अरविंद मेहता यांनी पोलिसांना सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे अरविंद मेहता यांना याआधीही याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

12 डिसेंबरला हरेश मिनत या प्रवाशाने अंधेरीला जाण्यासाठी दहिसरहून चर्चगेट फास्ट लोकल पकडली होती. सकाळी 10 वाजता तो अंधेरी रेल्वे स्थानकावर उतरला. यावेळी अरविंद मेहता यांनी त्याला फलाट क्रमांक सातवर पकडलं.

टीसीप्रमाणे पांढरा शर्ट आणि टाय घातलेल्या मेहता यांनी हरेशला तिकीट दाखवण्यास सांगितलं. तसंच बेकायदेशीरपणे अपंगांच्या डब्यातून प्रवास का केला अशी विचारणाही केली. हरेश याने आपल्याला कामावर जाण्याची घाई असल्याचं कारण दिलं. मात्र मेहता यांनी दंड भरण्यास सांगितलं.

मेहता यांनी हरेशकडून रोख पैसे घेतले मात्र त्याला पावती दिली नाही. यावरुन हरेशला संशय आला आणि त्याने पोलिसांना अलर्ट केलं. त्यांनी मेहता यांच्याकडे चौकशी केली असता ते टीसी असल्याचा बनाव करत असल्याचं उघड झालं. मेहता यांना अंधेरी जीआरपी पोस्टमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला.

मेहता कांदिवलीमधील चारकोपचे रहिवासी आहेत. चौकशी केली असता पोलिसांना त्यांनी याआधीही असाच गुन्हा केला असून सहा महिन्यांची शिक्षा झाली असल्याचं समोर आलं. ‘आम्ही त्यांना तुम्ही या वयात हा गुन्हा का करता अशी विचारणी केली. यावर त्यांनी आपल्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलाने सांभाळ कऱण्यास नकार दिला. मेहता एका कंपनीत काम करायचे. पण ती कंपनी बंद पडली. यामुळे त्यांच्याकडे खर्च भागवण्यासाठी काहीच पर्याय नव्हता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मेहचा यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button