breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या मार्गावर? लवकरच करणार घोषणा

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार साडेतीन दिवसांतच कोसळलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाचे मार्गच खुंटल्यामुळे भाजपचे काही नेते आता वेगळ्या मार्गाने जाण्याचा विचार करत आहेत. त्यात आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे.

पंकजा मुंडे भाजप सोडण्याचा विचार करत असल्याचं दिसत आहे. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी त्या गोपीनाथ गडावर मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून दारून पराभव झाला होता. तेव्हापासूनच पंकजा मुंडे प्रचंड नाराज आहेत.

भाजपचे सरकार आले तर किमान विधान परिषदेवर जाऊन राजकीय पुनर्वसन होण्याची आशा त्यांना होती. परंतु देवेंद्र फडणवीसांचे सरकार साडेतीन दिवसांतच कोसळले आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे भाजपत राजकीय पुनर्वसन होण्याच्या पंकजा मुंडेंच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळेच त्या वेगळा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये तसे स्पष्ट संकेतच पंकजांनी दिले आहेत.

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...

निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे. दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.

‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button