breaking-newsताज्या घडामोडीपुणे

देशातील ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचे निधन

जुन्नर – भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक आणि खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्पाचे निर्माते, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचे काल सायंकाळी पुण्यात निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. औध येथील स्मशानभूमीत रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. गोविंद स्वरुप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जातात. अलाहाबादमधून १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स पदवी संपादन करून डॉ. स्वरुप यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी. एस.आर. ओ. येथे खगोलशास्त्रविषयक कार्य सुरू केले. सिडनीजवळच्या पॉट्स हिल येथे सहा फूट व्यासाचा पॅराबॉलिक अँटेना उभारण्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता.

डॉ. स्वरुप यांचा जन्म उत्तराखंड राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकुरद्वारा या तालुक्याच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही उच्च शिक्षित होते. डॉ. गोविंद स्वरुप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळच्या कल्याणमध्ये उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या मदतीने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. डॉ. गोविंद स्वरुप यांनी दक्षिण भारतातल्या उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किमी अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालययीन शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले होते. त्यांना डॉ. के .एस. कृष्णन यांचे मार्गदर्शन लाभले होते. नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांचे ते सहकारी होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शालेय स्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हायला पाहिजे या मताचे ते होते. भारतीयांकडे विज्ञानाची दृष्टी आहे, मात्र अंमलबजावणीत आपण मागे पडतो. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान कार्यशाळा व्हायला हव्यात अशीही गरज त्यांनी बोलून दाखवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button