breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी काळात राष्ट्रवादीची लाट येणार, दादा मुख्यमंत्री होणार – धनंजय मुंडे

  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा विश्वास

पिंपरी – राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेबांनी असंख्य कार्यकर्त्यांना नेता बनविले. मात्र, दादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली त्यांनी पक्षाला दगा दिला. आगामी लोकसभा, विधानसभेला लाट वगैरे काही चालणार नाही. आता राष्ट्रवादीला लोकं पर्याय म्हणून पाहात आहेत. आगामी काळात राष्ट्रवादीची लाट येणार असून दादा मुख्यमंत्री होणार आहेत. त्याकरिता पक्षवाढीसाठी कामाला लागा, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

 

राष्ट्रवादीचे कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीतील कै. आंकुशराव लांडगे नाट्यगृहात रविवारी (दि. 22) युवक कॉंग्रेसच्या युथ कमिटीचा मेळावा पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार विलास लांडे, अशोक पवार, बापूसाहेब पाठारे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नेते नाना काटे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, माजी महापौर योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

मुंडे म्हणाले की, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला दादांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त 2020 मध्ये आषाढी एकादशी दादांच्या वाढदिवसादिवशी यावी. आणि दादांनी मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा करावी, ही विठ्ठलाच्या चरणी मागणी घालत आहे. येणा-या काळामध्ये बुथ कमिट्या करून चालणार नाही. तर, यादीच्या प्रत्येक पानासाठी एक प्रमुख नेमण्यात यावा. तो 60 मतदारांचा प्रमुख म्हणून काम करेल. त्यातून आपला मतदार, विरोधकांचा मतदार आणि हवेतील मतदारांचा आपल्याला अंदाज येईल. ही यादी एकत्र बसून पदाधिका-यांनी वाचली तर बसल्या जागी आपल्याला आपल्या मतदारांची खात्री येईल. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करा. सरकार कशा प्रकारे सर्वसामान्यांची लूट करत आहे, हे पटवून सांगा. जनतेला या गोष्टींमध्ये विचार करायला भाग पाडा. मोदी सरकारच्या विरोधात प्रचार करण्यासाठी “स्पेसिफीक” व्हा. साहेबांनी, दादांनी किती विकास कामे केली. याची जाणीव त्यांना करून द्या, अशा सूचना मुंडे यांनी युवक कमिटीच्या पदाधिका-यांना दिल्या.

 

विलास शेठ तुम्ही भाग्यवान आहात

पवार साहेब आणि दादांनी पिंपरी-चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला. उभा देश पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपल्याला पहायला मिळतो. कारण, रोजगार, नोकरीनिमित्त मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणातून तसेच देशाच्या कानाकोप-यातून सर्वसामान्य नागरिक शहरात स्थायीक झाला आहे. त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था ही दादांनी निर्माण केली आहे. आपण येवढे भाग्यवान असून निकाल आपल्या विरोधात गेला. दामोजीपंतांनी हवा पाहून पलटी मारली. त्यांच्यासाठी 2019 ला सिनेमाच्या शेवटाप्रमाणे “द एंन्ड” असणार आहे, असेही मुंडे म्हणाले.

 

स्वार्थापोटी ते पक्षातून बाहेर गेले

दादांनी शहराला घडवलं आहे. त्यामुळे शहर एका वेगळ्या दिशेने झेप घेत आहे. या शहरामध्ये दादांनी अनेकांना महापौर, आमदार केले. अनेक माणसे मोठी केली. त्यातील काहीजण स्वार्थापोटी पक्षातून बाहेर गेले. जे आहेत त्यांना बळ देण्याची गरज आहे. कार्यकर्ता फाटका असला तरी तो निष्ठावंत आहे. त्यांनी घरातल्या कामाप्रमाणे पक्षवाढीचे काम केले पाहिजे. पालिकेत वाट्टेल तसा कारभार सुरू आहे. त्याच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, असे माजी आमदार विलास लांडे यांनी कार्यकर्त्यांना बजावले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button