breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

तुकाराम मुंढेंची आता मंत्रालयात बदली

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची अखेर मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून तुकाराम मुढे यांची बदली होणार अशी चर्चा होती. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून निघाले आहेत. मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांची १२ वर्षाच्या कार्यकाळात ११ वेळा बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच नाशिकचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनात चांगले बदल घडले होते. कामकाजात सुसूत्रता आल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. मात्र, अवघ्या नऊ महिन्यांमध्येच त्यांची बदली करण्यात आली.  तुकाराम मुंढेंच्या बदलीची बातमी नाशिकमध्ये पसरताच नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध केला. सर्वसामान्य नाशिककरांनी एकवटत मुंढेंच्या बदलीविरोधात नारे दिले.

अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेलं पत्र तुकाराम मुंढेंना देण्यात आले आहे. मुंबईतील नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत.

बदली आणि मुंढे – 
तुकाराम मुंढे यांची फेब्रुवारीमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तर त्याच्या अगोदर वर्षभरापूर्वीच त्यांची नवी मुंबईतून पुण्यात बदली करण्यात आली होती. नवी मुंबई महापालिकेत मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यापूर्वी सोलापूरमध्येही कारवाईचा धडाका सुरु ठेवल्याने २०१७ मध्ये त्यांची तिथून बदली करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button