breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘ढेपे वाडा’ वास्तूला बौद्धिक स्वामित्व हक्क

पुण्यातील वाडा संस्कृतीचा देशभरात बहुमान

भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम  करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून  बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.

हा बहुमान मिळवणारी ही भारतातील पहिली पारंपरिक वास्तू ठरली आहे. ‘ढेपे वाडा’चे संस्थापक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बौद्धिक स्वामीत्व हक्क हा बहुमान संपादन करणारी ही देशातील पहिलीच वास्तू आहे. या घटनेचा अभिमान असला तरी बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाल्यामुळे नेमका लाभ काय होऊ शकतो याची आम्हालाही कल्पना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी, या उद्देशातून ढेपे वाडा वास्तू साकारण्यात आली.

मी स्वत: वास्तुविशारद आहे. अनेक वाडय़ांच्या जागेवर अपार्टमेंटची निर्मिती केल्यानंतर सदनिकेच्या किल्ल्या लोकांना देत असताना आपण वाडा या संस्कृतीपासून दूर जात आहोत याची खंत मला सतत जाणवत होती. महाराष्ट्रातील पारंपरिक वाडा संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशातून ढेपे वाडा या वास्तूची निर्मिती साकारू शकलो याचा आनंद वाटतो, असे नितीन ढेपे यांनी सांगितले. आमच्या संकेतस्थळाला गेल्या चार वर्षांत जगभरातून जवळपास ७५ लाख लोकांनी भेट दिली आहे. ढेपे वाडा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटनाचा मार्ग स्वीकारावा लागला असला, तरी मूळ उद्देशांपासून तसूभरही लांब जाणार नाही याची दक्षता घेतली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नावे वेगळी, संस्कृती एकच

भारताच्या प्रत्येक राज्यातील पारंपरिक वास्तुरचनांची नावे वेगळी असली, तरी त्यातील वाडा संस्कृती एकच आहे. आंध्र प्रदेशामध्ये चुट्टीलू किंवा मांडूवा लोगीस, तमीळनाडूमध्ये चेट्टीनाडू हाउस केरळात नेलूकेट्टू किंवा थरवाड, कर्नाटकात गुठ्ठू हाउस, पश्चिम बंगालमध्ये राजबारी हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये हवेली तर महाराष्ट्रामध्ये वाडा म्हणतात, असे नितीन ढेपे यांनी सांगितले.

विशेष काय?

वाडा संस्कृतीमध्ये कला बहरली. नंतरच्या काळात आर्थिक बाबींना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे वाडा संस्कृतीमध्ये नांदणारे खेळीमेळीचे वातावरण संपुष्टात आले. एकत्र कुटुंबातील प्रत्येकाला विभक्त व्हायची स्वप्न पडू लागली. जुन्या पारंपरिक वास्तू झपाटय़ाने नामशेष होऊन तेथे मोठय़ा इमारती उभ्या राहिल्या. काही वास्तूंचे रूपांतर हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये झाले. मात्र, नव्याने बांधलेल्या ढेपे वाडय़ाद्वारे पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय लोकांनी समृद्ध भारतीय संस्कृतीतील वास्तुरचना आणि त्यातील राहणीमानाकडे पुन्हा वळावे यासाठी आदर्श ठेवण्यात आला आहे. भारतीय पारंपरिक वास्तूंमध्ये पूर्वी साजरे होणारे साखरपुडा, लग्न, मुंज, वाढदिवस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने साजरे करणारी ढेपे वाडा ही एकमेव वास्तू ठरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button