breaking-newsताज्या घडामोडीपुणे

टेंभूच्या पाण्यासाठी सांगोल्यात ‘जिंकू किंवा मरु’ची लढाई

– शहरात कडकडीत बंद पाळून व्यापा-यांचा आंदोलनाला पाठिंबा

– 14 गावच्या शेतक-यांचा आक्रमक पवित्रा

पुणे ( महा ई न्यूज ) – टेंभूच्या पाण्यासाठी शेतकरी बांधवानी ‘जिंकू किंवा मरु’ची लढाई सुरु केली आहे. टेंभूच्या पाण्यातून माण नदीवरील बंधारे भरुन द्यावेत, कोरडा नदीसह विविध तलावात म्हैशाळ योजनेतून पाणी सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी मागील आठ दिवसापासून जनावरांसह 14 गावांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यात आज ( शनिवारी) कडकडीत बंद पाळण्यात आला.

पाण्यासाठी कडलास येथील दीपक पवार आणि काॅंग्रेसचे युवक अध्यक्ष दत्ता टापरे हे दोघेजण सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.  त्या दोघांचीही प्रकृती खालावत चालली आहे. तरीही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान,  पुण्यातील सर्कीट हाऊसवर राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याविषयी कोणताही तोडगा न निघाल्याने परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. 

माण नदी काठावरील तसेच फाटा क्रमांक 4 व 5 मधील १४ गावातील शेतकरी बांधव जनावरांसह सांगोला तहसील कार्यालयासमोर तळ ठोकून बसले आहेत. या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी वर्ग वेळकाढूपणा करुन दु्र्लक्ष करु लागले आहेत.  मात्र, शेतकरी बांधव आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे.  जलसंपदा विभागाकडून मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

टेंभू योजनेतील पाण्याने बलवडीपासून मेथवडेपर्यंतचे बंधारे कमीतकमी २५% भरून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी पुण्यातील सर्कीट हाऊसवरील जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत कृती समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधीची दोन तास झालेल्या चर्चेत कोणताही निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. मात्र, त्यावर थातूर-मातुर उत्तर देत टेंभूच्या अधिका-यांना पाण्याचे योग्य नियोजन करुन आराखडा बनविण्याचे तोंडी आदेश मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. परंतू, म्हैशाळच्या पाण्यासह निरा-उजवा कालव्याचे पाण्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केलेली नाही. 

सांगोल्यात हक्काच्या पाण्यासाठी युवकांनी आंदोलनात उडी मारल्याने आजी-माजी लोकप्रतिनिधींची चांगलीच पंचाईत होवून त्यांची धावपळ सुरु झाली आहे. मागील 55 वर्षांत पाण्याच्या राजकारणावर निवडणुका झाल्या. तरीही शेतीचा पाणी प्रश्न सुटलेला नाही.  सध्यस्थितीत सांगोल्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने पशुधन व शेतातील रब्बीची पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. पाणी आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख  (सोमवारी दि. 26) या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्याना भेटणार आहेत.  टेंभू म्हैशाळसह निरा-उजवा कालव्याचे पाणी सांगोल्याला मिळावे, याकरिता मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. या बैठकीसाठी अन्य राजकीय नेतेंमंडळी मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत.  पाणी प्रश्नावर जनतेचा रेटा वाढवण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यात सर्वत्र कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button