breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘टॅक्सी कॅब’ची संख्या तीनच वर्षांत सहापट!

ओला, उबरचा शहरांतर्गत प्रवास वाढल्याचा परिणाम

अ‍ॅपवर आधारित शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबर या कंपन्यांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये टॅक्सी कॅब प्रकारातील वाहनांची संख्याही झपाटय़ाने वाढत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात दुचाकी आणि मोटारींच्या वाढत्या संख्येने वाहतूक आणि प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच मागील केवळ तीनच वर्षांत  टॅक्सी कॅबची संख्या तब्बल सहापटींनी वाढली असल्याचे वास्तव आहे.

देशातील कोणत्याही शहराच्या तुलनेत पुणे शहरामध्ये वाहनांच्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. सद्य:स्थितीत पुणे शहरातील रस्त्यांवर सर्व प्रकारांतील मिळून ३७ लाख ८६ हजार वाहने आहेत. वाहनांची ही संख्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. त्यात सर्वाधिक सुमारे २८ लाख दुचाकी वाहने आहेत. त्या पाठोपाठ मोटारींनी संख्या सुमारे साडेसहा लाखांवर आहे. पीएमपीसारख्या सार्वजनिक वाहनांचा बोजवारा उडाला असल्याने दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुकीचा आणि प्रदूषणाचाही गंभीर प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक अपुरी असल्याने नागरिकांकडून खासगी वाहनांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. भरीस भर म्हणून राज्य शासनाने रिक्षा परवाने खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिक्षांची संख्याही शहरातील रस्त्यांवर वाढली. ४५ हजारांवर असलेल्या रिक्षा सध्या ६५ हजारांवर पोहोचल्या आहेत.

सर्वच प्रकारच्या वाहनांची संख्या वाढत असताना ओला, उबरसारख्या कंपन्यांनी शहरात प्रवासी वाहतुकीचे जाळे वाढविल्याने बेरोजगार किंवा रिक्षा व्यवसायातून आलेल्या मंडळींकडून टॅक्सी कॅबची खरेदी केली जात आहे. सहल परवान्यावर असलेल्या या वाहनांच्या माध्यमातून शहरांतर्गत प्रवासी वाहतूक अनधिकृत असली, तरी त्याबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने कारवाई केली जात नाही. प्रवाशांकडूनही अ‍ॅपवरील या सुविधेला प्रतिसाद दिला जात असल्याने दिवसेंदिवस वाहने वाढत आहेत. २०१५ मध्ये पुणे शहरात टॅक्सी कॅबची संख्या ५,६७८ होती. त्यात २०१६ पासून झपाटय़ाने वाढ होऊ लागली. २०१६ मध्ये टॅक्सी कॅबची संख्या १० हजारांच्या पुढे गेली. २०१७ मध्ये ती दुप्पट होऊन २२ हजारांच्या पुढे गेली. सद्य:स्थितीत शहरात ३३ हजारांच्या आसपास टॅक्सी कॅब आहेत. तीन वर्षांचा विचार केल्यास ही संख्या सहापट झाली आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही ही वाहने झपाटय़ाने वाढत आहेत. २०१५ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये १७ हजार टॅक्सी कॅब होत्या. सद्य:स्थितीत तेथे ३० हजारांहून आधिक टॅक्सी कॅब धावत आहेत.

बाहेर नोंदलेल्या वाहनांची घुसखोरी सुरूच

शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी शहरामध्ये टॅक्सी कॅब प्रकारातील वाहनांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत असल्याने रस्त्यावर या वाहनांची संख्या वाढत असतानाच बाहेर नोंदणी झालेल्या वाहनांची घुसखोरी अद्यापही सुरू असल्याचे दिसून येते. पुणे प्रादेशिक कार्यालयात नोंदलेल्या वाहनांचा नोंदणी क्रमांक ‘एमएच १२’, तर पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदल्या जाणाऱ्या वाहनांच्या क्रमांकाची सुरुवात ‘एमएच १४’ने होते. मात्र, या दोन्ही क्रमांकाशिवाय राज्यात आणि देशात इतर ठिकाणी नोंदणी असलेली वाहनेही शहरांतर्गत वाहतूक करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील टॅक्सी कॅबची संख्या आरटीओतील नोंदणीपेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button