breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

झाडांमुळे प्रकल्प रखडले!

वृक्ष प्राधिकरण समितीवरील नेमणुकांचा पेच कायम; झाडे तोडण्याची परवानगी नसल्याने अनेक कामे अर्धवट

वृक्ष प्राधिकरण समितीवरील तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका न्यायालयीन खटल्यात अडकल्यामुळे मुंबईतील वृक्षतोडीबाबत मंजुरी देण्याची प्रक्रियाच ठप्प झाली आहे. याबाबत पालिकेला उच्च न्यायालयाने बुधवारीही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिंदमाता येथील पर्जन्य जलवाहिनीबरोबरच मेट्रोची कारशेड, बोरिवली, वर्सोवा आणि विक्रोळी येथील उड्डाणपूल अशी अनेक कामे रखडली आहेत.

यापैकी हिंदमाता येथील पर्जन्य जलवाहिन्यांचे काम पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. परंतु, येथील ५२ झाडे काढण्याचा प्रस्ताव या तज्ज्ञांच्या नेमणुकांअभावी रखडला आहे. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनीच्या रुंदीकरणाचे सुमारे २० टक्के काम रखडले आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातही हिंदमातामध्ये पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागणार आहे.

याशिवाय पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे विविध प्रकल्पांमध्ये बाधीत होणारी झाडे कापण्यासाठी व पुनरेपित करण्यासाठीचे साधारणपणे १५च्या आसपास प्रस्ताव प्रलंबित आहेत.  यात पालिकेचे स्वत:चे व एमएमआरडीएचे मेट्रोच्या कामांसाठीचे अनेक प्रस्ताव आहेत. मेट्रो स्थानक आणि कारशेडसाठी साधारण ८०० झाडे कापावी लागणार आहेत. याशिवाय कांदिवली येथील रुग्णालयासाठी ८००, जलवाहिन्यांलगत बांधण्यात येणाऱ्या ग्रीन व्हील प्रकल्पांतर्गत १००हून अधिक, बोरीवली, वसरेवा, विक्रोळी येथील उड्डाणपुलांकरिता २००, कांदिवलीतील नालेकामासाठी १५० झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागणार आहे. या शिवाय रस्ते काम, पवईतील पंपिंग स्टेशन आदी कामांसोबत इमारत बांधकामाआड येणारी झाडेही तोडण्याची परवानगी प्राधिकरणाकडे मागण्यात आली आहे. परंतु, ही सर्व कामे रखडली आहेत. प्राधिकरणाची पुढील बैठक १५ ते २० दिवसांनी होणार असून तोपर्यंत जून महिना सुरू होईल. त्यामुळे हिंदमाता येथील उर्वरित कामही रखडणार आहे.

किती सदस्य असावेत?

वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सध्या १३ निवडून आलेले सदस्य आहेत. बाजार उद्यान समितीचे अध्यक्ष हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. तर पालिका आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतात. पालिकेच्या नियमानुसार या समितीमध्ये १३ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य हे नामनिर्देशित असू शकतात, अशी माहिती चिटणीस विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्यासाठी पालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यात पालिका प्रशासनाने चार व्यक्तींची निवड केली होती व तशी माहिती न्यायालयात सादर केली होती.

हिंदमाता परिसर यंदाही तुंबणार?

* हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबून राहण्याचा कालावधी कमी झालेला असला तरी जरासा पाऊस पडला की येथे पाणी भरते. यावर उपाय म्हणून पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगत बी. जे. देवरुखकर मार्ग ते मडकेबुवा चौक या दरम्यान ब्रिटीशकालीन पर्जन्यजल वाहिन्या आहेत. या वाहिनीला लागून असलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होत असल्यामुळे ही झाडे काढून टाकणे आवश्यक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

* या पर्जन्यजल वाहिन्यांचे पुनर्बांधकाम  सध्या सुरु आहे.  ३,००० मिमी रुंदी व १,२०० मिमी उंचीची ‘बॉक्स ड्रेन‘ प्रकारची पर्जन्यजलवाहिनी याठिकाणी बांधण्यात येत आहे. त्याचे २० टक्के काम रखडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button