breaking-newsUncategorizedराष्ट्रिय

‘चांद्रयान-२’बद्दल अब्दुल कलाम यांनी १० वर्षांपूर्वीच दिला होता सल्ला, म्हणाले होते…

हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने गेल्या १५ जुलै रोजी उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलेले चांद्रयान-२चे उड्डाण आज सोमवारी, दुपारी २.४३ वाजता होत आहे. ‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या हेलियम टाकीतील दाब कमी झाल्याने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द करण्यात आले होते. या उड्डाणाची उलटगणती रविवारी ६.४३ वाजता सुरू करण्यात आली. याच उड्डाणाच्या निमित्त आज अनेकांना भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखल्या जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आवर्जून आठवण येताना सोशल नेटवर्किंगवर पहायला मिळत आहे. याच ‘चांद्रयान-२’ मोहिमेबद्दल कलाम यांनी एक महत्वाचा सल्ला दहा वर्षापूर्वीच दिला होता.

डॉ. कलाम यांनी ‘चांद्रयान-२’ मोहिमेबद्दल दहा वर्षापूर्वीच इस्रो आणि नासाला सल्ला दिला होता. २००८ साली भारताने चंद्रावर पाठवलेल्या ‘चांद्रयान-१’वरील एमआयपीने (मून इमपॅक्ट प्रॉब) चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची नोंद केली होती. नासानेही ‘चांद्रयान-१’च्या या संशोधनाला दुजोरा दिला होता. ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर भारताने चंद्रावर आणखीन एक मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळेस केवळ चंद्राच्या कक्षेत जाऊन निरिक्षण करणाऱ्या यानाऐवजी चंद्रावर यान उतरवण्याचा इस्त्रोचा इरादा होता. त्यानुसारच ‘चांद्रयान-२’ची आखणी करण्यात आली असून चंद्रावर यान उतरवण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. ‘चांद्रयान-१’ च्या यशानंतर वर्षभराने मुंबईमध्ये झालेल्या ”चांद्रयान: आश्वासने आणि चिंता’ या विषयावरील परिसंवादामध्ये कलाम यांनी आपले मत मांडले होते. ‘चंद्रावर पाण्याचा अंश सापडल्याच्या भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एमआयपीच्या दाव्यावर सध्या संशोधन सुरु आहे. नासाने भारताच्या ‘चांद्रयान-२’वर रोबोटीक पेनिटेटर (पृष्ठभागावर खड्डा पाडू शकणारा रोबोट) लावायला हवा. त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अंश आहेत का याचा अधिक योग्य पद्धतीने अभ्यास करता येईल,’ असा सल्ला कलाम यांनी यावेळी नासा आणि इस्त्रोला दिला होता.

‘इस्त्रो आणि नासाने भविष्यातील ‘चांद्रयान-२’साठी एकत्र येऊन काम करावे असा मी सल्ला देईन. ‘चांद्रयान-२’वर नासाने रोबोटीक पेनिटेटर बसवावा. मी नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीला भेट दिली. त्यावेळी तेथील शास्त्रज्ञांनी मला आणि माझ्या सोबतच्या भारतीय वैज्ञानिकांना ‘मून मिनरलॉजी मॅपर’च्या (एमथ्री) माध्यमातून सापडलेली माहिती दिली होती,’ असं कलाम यावेळी म्हणाले होते.

याच परिसंवादात कलाम यांनी अंतराळ संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना २०५० पर्यंत एवघ्या एक किलोग्राम वजनाचे यान तयार करता येईल असा प्रयत्न करावा तसेच यान निर्मितीचा खर्च २० हजार डॉलरवरुन २ हजार डॉलरपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करावा असे दोन महत्वाचे सल्ले दिले होते.

२००३ साली कलाम यांना ‘इस्त्रो’च्या ‘चांद्रयान-१’च्या उद्देशांबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ”चांद्रयानाच्या मदतीने चंद्राची माहिती घेतल्यास संपूर्ण देशात खास करुन तरुण वैज्ञानिक आणि लहान मुलांमध्ये नवउर्जा संचारेल. भविष्यात इतर ग्रहांना भेटी देण्याची ही केवळ सुरुवात आहे याबद्दल मला खात्री आहे,’ असं मत नोंदवलं होतं.

नासाने केली ही मदत

‘चांद्रयान-२’मधील ‘रोव्हर प्रग्यान’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून अगदी कलाम यांच्या सल्ल्याप्रमाणे नासाकडून त्यामध्ये पृष्ठभाग खोदणारा रोबोट लावण्यात आला नसला तरी नासाकडून देण्यात आलेली लेझर प्रणाली या यानात वापरली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाबरोबरच चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षणासंदर्भात अभ्यास करता येणार आहे. ‘रोव्हर प्रग्यान’ हे सहा चाकी व्हेइकल असून त्यामध्ये छोट्या आकाराचा अल्फा पार्टीकल एक्स रे स्केक्टोमीटर आहे. याच्या मदतीने चंद्रावरील पृष्ठभाग आणि दगड कशापासून तयार झाले आहेत याचा अभ्यास केला जाणार आहे.

‘चांद्रयान-२’ मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button