breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गॅलेक्सी ग्रुपच्या संस्थापक संचालकांना अटक : एटीएस आणि सीआयडीची संयुक्त कारवाई

पुणे – गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीच्या वीस वर्षांपासून फरार असलेल्या दोन संस्थापक-संचालकांना उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथक आणि सीआयडीच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे.

सतीशचंद्र भगवतीप्रसाद मिश्रा (वय ६५, रा. संत कबीर नगर), रामकृष्ण प्रेमचंद दुबे (वय ५८, रा खलीलाबाद, संत कबीरनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर प्रमोदकुमार गंगा पांडे, अमोदकुमार पांडे, घन:श्याम कालीप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दुलमजीद खाल, रहेफिरदौस अफताब अहमद सिद्दीकी, सतेंद्र वशिष्ठ त्रिपाठी (सर्व रा. उत्तरप्रदेश) यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु आहेत. गॅलेक्सी कंपनीविरुद्ध उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह महाराष्ट्रात दाखल असलेल्या २६ गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही आरोपी फरारी होते. त्यांच्याबद्दल सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना माहिती मिळाली होती. त्यांनी उत्तरप्रदेशचे दहशतवादविरोधी पथकाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक असीम अरुण यांच्याशी संपर्क साधला. सीआयडीचे एक पथक उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले. उत्तरप्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र सीआयडी यांची संयुक्तपणे कारवाई करीत दोघांना लखनऊमध्ये अटक केली. आरोपींना नागपूर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या उप कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांची रजिस्टर ऑफ कंपनीज, कानपूर कार्यालयामध्ये नोंद करण्यात आलेली होती. महाराष्ट्रामध्ये या कंपनीच्या तब्बल १०२ शाखा होत्या. कंपनीने अधिक व्याजाचे आमिष दाखवत लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. प्रत्यक्षात त्यांना कोणताही परतावा अथवा व्याज न देता १९९९ साली ७ कोटी ८ लाख ४९ हजार २६६ रुपयांचा अपहार करुन कंपनीने गाशा गुंडाळला होता. त्यानंतर ठेवीदारांनी वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, वासिम, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, ठाणे, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये गुन्हे दाखल झाले होते.

सीआयडीच्या तपासामध्ये या पाचही कंपन्या आरबीआयकडे गैर बॅकिंग कंपन्या (एनबीएफसी) म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ४ कोटी, ८६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

आरोपींची माहिती मिळाल्यावर पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे) पल्लवी बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, यशवंत निकम आणि पोलीस हवालदार कृष्णकांत देसाई, दत्तात्रय भापकर यांनी परिश्रम घेतले. लखनऊमध्ये पथक दाखल झाल्यानंतर तब्बल चार दिवस तेथे तळ ठोकावा लागला. आरोपींवर बारीक लक्ष ठेवत त्यांना संधी पाहून जेरबंद करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button