breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“कॉसमॉस’ सायबर दरोडा प्रकरणात रिकव्हरी सुरू

  • 71 एटीएम, 428 क्‍लोन कार्ड : 9 जणांकडून साडेचार लाखांवर रोकड वसूल

पुणे – कॉसमॉस बॅंकेच्या सायबर हल्ला (मालवेअर अटॅक) प्रकरणात देशभरातील 71 बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, राज्यात 428 क्‍लोन कार्ड वापरुन पैसे काढले गेले आहेत. यामध्ये पुण्यात 171 कार्डचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आजवर 9 जणांकडून 4 लाख 70 हजार वसूल केले आहेत. यात सोमवारी नंदुरबार येथून 99 हजार आणि पुण्यातील एकाकडून 16 हजार वसूल करण्यात आले आहेत. जमा झालेले जादा पैसे यांनी तत्परतेने काढून घेतले होते.

कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हर सिस्टिमवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून सायबर हल्ला झाला आहे. आंतरराष्ट्रीय हॅकरने 80 कोटी 50 लाख रुपये अवघ्या दोन तास 13 मिनिटांत क्‍लोन व्हिसा व एटीएम कार्डचा वापर करुन काढले आहेत. हे पैसे 28 देशांतील एटीएमधून काढल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये क्‍लोन व्हिसा कार्डद्वारे काढण्यात आलेली रक्कम 78 कोटी इतकी आहे. तर भारतातील विविध एटीएममधून क्‍लोन एटीएम कार्ड वापरुन 2 कोटी 50 लाख इतकी रक्कम काढण्यात आली आहे. तसेच स्विफ्ट ट्रान्झॅक्‍शनव्दारे कॉसमॉस बॅंकेतील 13 कोटी 92 लाख रुपये हॉंगकॉंग येथील हॅनसंग बॅंकेत वर्ग झाले आहेत. अशाप्रकारे बॅंकेला 94 कोटी 42 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेने हादरलेल्या कॉसमॉस बॅंकेने तातडीने त्यांचे एटीएम, इंटरनेट बॅकींग आणी मोबाइल बॅंकिंग सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवली होती.

याप्रकरणी कॉसमॉस बॅंकेतर्फे मॅनेजिंग डायरेक्‍टर सुहास सुभाष गोखले (53) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच पुणे सायबर क्राइम सेल, रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हिसा व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली आहे. या सायबर हल्ल्याचा तपास करण्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीलाही काम सोपवण्यात आले आहे.

बॅंकांकडून प्रतिसाद नाही
कॉसमॉस सायबर दरोडाप्रकरणातील तपास खूपच तांत्रिक आणि अनेक देशांमध्ये विस्तारलेला आहे. यामुळे पोलिसांनाही खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत आहे. परदेशांतील बॅंकांशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एकूण 28 देशांपैकी 10 प्रमुख देशांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. देशांतर्गत ज्या 71 बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढले गेले आहेत, त्यांच्याशीही पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, या बॅंकांनी पत्रव्यवहाराला अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button