breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रहदारी, पादचाऱ्यांसाठी जागा ठेऊनच मंडप उभारा

गणेशोत्सव मंडप नियमावली जाहीर : ऑनलाइन अर्ज बंधनकारक

परवानगी न घेतलेल्या मंडळांवर त्वरित कारवाई

पुणे – महापालिकेकडून मंडप नियमावली जाहीर करण्यात आली असून, शहरातील सर्व मंडळांनी उत्सवाच्या 10-12 दिवस आधीच सर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. योग्य वेळेत परवानगी न घेतलेल्या मंडळांवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय रहदारी, पादचाऱ्यांसाठी जागा ठेऊनच मंडप उभारण्याचे सूचित करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाला 13 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे किमान 1 सप्टेंबरपर्यंत मंडपाच्या परवानगी घेणे सर्व मंडळांना बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आणि महापालिकेच्या परवानगीसाठी संबंधित नेमून दिलेल्या कार्यालयाकडे कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत असे आवहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

परवानगीतील अटी-शर्तीनुसार मंडप, कमानी, स्टेज, रनिंग मंडप उभारणे बंधनकारक आहे. यांची उभारणी करताना त्या ठिकाणच्या दर्शनी भागात मान्य परवान्याची प्रत प्लास्टिक कव्हरमध्ये घालून सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली गठीत केलेल्या मंडप तपासणी पथकामार्फत उत्सव सुरू होण्याच्या आधी सात दिवस अगोदर या तपासणीला सुरूवात होणार आहे.

याचा तपासणी अहवाल सक्षम प्राधिकाऱ्याकडे उत्सव सुरू होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर सादर करणे आवश्‍यक आहे. अहवालात आढळून येणाऱ्या अनधिकृत रचनांवर महापालिका आणि स्थानिक पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

मंडप उभारताना रहदारीस अडथळा होणार नाही, अशा रितीने 2/3 अथवा त्यापेक्षा जास्तीचा रस्ता मोकळा ठेवून पादचाऱ्यांसाठी आणि रहदारीसाठी जागा रिकाम्या ठेवून मंडप उभारावेत. महत्त्वाचे म्हणजे ते उभारताना रस्ता अथवा पदपथांवर खड्डे घेऊ नयेत, हे स्पष्टपणे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

वाहतूक पोलीस विभागाने त्याचे ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद केलेल्या मंडपाच्या साईजपेक्षा जास्त मापाचे मंडप उभारणी केल्यास त्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषण नियमांचेही सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे. मंडप, ध्वनीप्रदूषण, कमानी, एखावे याबाबत नागरिकांना तक्रार करायची असल्यास त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आणि पोलीस ठाणे स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा उभारण्यात आली आहे. तेथे नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनिप्रदूषण तक्रारींची तातडीने दखल
उत्सव काळात ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी आणि त्यांचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी सर्व नागरिकांना पोलीस आयुक्तालयामध्ये www.punepolice.gov.in/circulars या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी केलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल, असा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

तक्रार करण्यासाठीचे अन्य पर्याय
मायक्रो संकेतस्थळ – http:/complaint.punecorporation.org
टोल फ्री नंबर – 18001030222
मोबाइल ऍप – PUNE Connect (PMC Care)
ईमेल – [email protected]@punecorporation.org

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button