काका दुचाकी देत नाहीत म्हणून युवकाने स्वत:च्या बाईकसह जाळल्या आठ गाडया
वारंवार विनंती करुनही काका बाईक देत नाहीत म्हणून संतापाच्या भरात २३ वर्षीय युवकाने बाईक पेटवून दिली. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या अन्य तीन बाईक आणि चार ऑटोरिक्षा जळून खाक झाल्या. ठाण्याच्या लोकमान्य नगरमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी इंदिरा नगर येथे राहणारा युवक अजय बुमबाक याला पुरावे आणि त्याने दिलेल्या कबुलीच्या आधारावर अटक केली.
अजयच्या वडिलांनी ही बाईक विकत घेतली होती. पण त्याचे काका बाईक वापरत होते. बाईक वडिलांच्या नावावर असल्यामुळे अजयला बाईकच्या चाव्या त्याच्या ताब्यात हव्या होत्या. बाईकचे काही हप्ते सुद्धा त्याने भरले होते असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.
काका बाईकच्या चाव्या देत नाहीत त्यावरुन अजयचा त्याच्या काकांबरोबर वाद झाला होता. तुम्हाला याचे परिणाम दिसतील असा इशाराही त्याने दिला होता. सोमवारी पहाटे अजय तीन वाजता बाईक पार्क केलेल्या तिथे गेला व बाईक पेटवून दिली. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडयाही जळाल्या.