breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कर्मचारी महासंघापुढे आयुक्त झुकले ; अखेर 155 ‘पीएमपी’ कर्मचारी महापालिकेत वर्ग

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पीएमपीएमएल’च्या 155 कर्मचाऱ्यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आज (मंगळवारी) घेवून त्या आदेशाच्या प्रस्तावावर त्यांनी सही केली आहे. त्यामुळे महापालिका विभाग प्रमुखांचा विरोध डावलून आयुक्त महापालिका कर्मचारी महासंघापुढे झुकल्याचे दिसून आले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे सुमारे 235 कर्मचारी सन 2001 पासून कामकाज करीत होते. त्यातील 80 कर्मचारी सेवानिवृत्ती झाले असून, 155 कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहेत.  त्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन, भत्ते व अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ते घेत होते. मात्र, ते महापालिकेचे कामकाज करीत होते. त्यांची हजेरीची प्रतिपूर्ती दरमहिन्याला महापालिका पीएमपीएमएलकडे पाठवून देत होती. याबाबत तत्कालीन आयुक्‍त श्रीकर परदेशी यांनी देखील आदेश काढून महापालिकेतील कर्मचारी पीएमपीएमएलकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. परंतु कर्मचारी युनियनचा दबाव व राजकीय नेत्यांचा वरदहस्ताने त्या आदेशास त्यांना स्थगिती द्यावी लागली होती.

ही बाब पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी महापालिका आयुक्‍त दिनेश वाघमारे यांना पत्र देऊन कर्मचारी कार्यमुक्‍त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने 178 चतुर्थ श्रेणीतील शिपाई, हेल्पर, क्‍लिनर, वाहन चालक, लेबर यांच्यासह अन्य पदनाम सर्व कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेतून वर्ग करण्याचा आदेश काढला.

पीएमपीएमएलमध्ये रुजू झालेल्या या 155 कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेत, महापालिका प्रशासनात परतण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र, तुकाराम मुंडे यांची बदली होताच, त्या कर्मचाऱ्यांना पालिकेत रुजू करुन घेण्यास राजकीय हालचाली जोरदार वाढल्या. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तसेच पीएमपीच्या नयना गुंडे यांनी त्या कर्मचा-यांनी परत महापालिकेत वर्ग करुन घेण्यास हरकत नसल्याचे सांगत त्यांनी तसा आदेश काढला. परंतू, ते कर्मचारी वर्ग करण्यास पालिका विभाग प्रमुखाच्या विरोधामुळे आयुक्तांनी त्या प्रस्तावावर सही करण्यास हात आखडता घेतला होता.

दरम्यान, त्या कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएल सेवेतून पुन्हा पालिका आस्थापनेवर वर्ग करण्यास पालिका पदाधिका-यांसह कर्मचारी महासंघाचा पाठिंबा होता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना कार्यशैलीत सुधारणा करण्याची तंबी देत अखेर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पीएमपीच्या 155 कर्मचा-यांना महापालिका आस्थापनावर वर्ग करण्याच्या प्रस्तावावर सही करुन तसा आदेश काढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button