breaking-newsमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आलोकनाथ थोडा खेद बाळगा! माफ करेन- विनिता नंदा

#MeToo या मोहिमे अंतर्गत विनिता नंदा यांनी संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. विनिता नंदा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आलोकनाथांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आलोकनाथ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशातच आलोकनाथ तुम्ही केलेल्या कृत्याचा थोडा खेद बाळगा मी तुम्हाला माफ करेन असं विनिता नंदा यांनी म्हटलं आहे.

आलोकनाथ तुम्ही जे वागलात ते वर्तन निषेधार्ह आहे यात काहीही शंकाच नाही. मात्र जर तुम्ही केलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही खेद बाळगला माझी माफी मागितली तर मी तुम्हाला माफ करेन असं विनिता नंदा यांनी म्हटलं आहे. मला तुमचा बदला घ्यायचा नाही, मात्र तुम्ही अजूनही काहीही केलेले नाही असेच म्हणत आहात. जे वागलात त्याची थोडी तरी लाज बाळगा, जे कृत्य केले ते केलेच नाही असे म्हणून कानावर हात ठेवणे चांगले नाही. माझ्यासोबत गैरप्रकार करून आता मलाच दोषी ठरवत आहात त्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारा अंतर्मुख होऊन विचार करा, तुमची चूक मान्य केलीत तर तुम्हाला नक्की माफ करेन असं विनिता नंदा म्हटल्या आहेत. मात्र तुमचे वागणे जर बदलले नाही तर माझी लढाई न्याय मिळेपर्यंत सुरुच राहिल असेही विनिता नंदा यांनी ठणकावले आहे.

माझ्यावर आलोकनाथ यांनी बलात्कार केला. ते आता मान्य करत नाहीत मलाच दोषी ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र न्यायासाठी मी लढत राहणार असे विनिता नंदा यांनी म्हटले आहे. आलोकनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला ही बाब समाधानाची आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मी जेव्हा माझी व्यथा मांडली तेव्हा मला माझ्या मित्रांकडून कुटुंबीयांकडून चांगला पाठिंबा मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते असेही त्या म्हटल्या आहेत.

मला आलोकनाथ यांचा बदला घ्यायचा आहे असे अजिबात नाही. मात्र आजही ते ज्याप्रकारे वागत आहेत ते चुकीचेच आहे. माझ्याकडे त्यांनी त्यांची चूक मान्य करावी मी त्यांना माफ करेन. अन्यथा सगळी कायदेशीर लढाई लढण्याची आणि ती शेवटापर्यंत घेऊन जाण्याची माझी तयारी आहे. मी लढाईत खचणार नाही माझे कुटुंबीय आणि माझे सहकारी मित्र-मैत्रिणी मला शेवटपर्यंत साथ देतील असेही विनिता नंदा यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना विनिता नंदा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मीटू या मोहिमेमुळे देश जागा होताना मी पाहिला आहे. ही मोहीम आपल्याकडे आधीच राबवली गेली असती तर बरे झाले असते असेही विनिता यांनी म्हटले आहे. तसेच ही लढाई माझ्या एकटीची नसून अशा सगळ्यांची आहे ज्यांच्यावर अन्याय झाला. अनेक महिलांनी आवाज उठवला. अनेक महिला अजूनही शांत आहेत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी असेही मत विनिता नंदा यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button