breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत आज बायडेन, हॅरिस शपथविधी! राजधानीला लष्करी छावणीचे स्वरुप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे बुधवारी अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हॉलमध्ये (अमेरिकेच्या संसद भवनात) ६ जानेवारी रोजी केलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. हजारो सैनिक या ठिकाणी असल्याने या परिसराला लष्करी छावणीचं स्वरुप आलंय.

आज सकाळी ११ वाजता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल. यात गायिका आणि डान्सर लेडी गागा ही अमेरिकेचे राष्ट्रगीत गाणार आहे. तर अमांडा गोरमॅन एक खास कविता सादर करणार आहेत. तसेच लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजही या कार्यक्रमात कलाकारी सादर करणार आहे. तर अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे १२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) कॅपिटलच्या वेस्ट फ्रण्टवर बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील. कॅपिटल हॉल ही शपथविधी सोहळ्याची पारंपरिक जागा असून या ठिकाणी नॅशनल गार्ड्सचे २५ हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच व्हाइट हाऊसकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. व्हाइट हाऊस आणि कॅपिटल परिसरात हजारोच्या संख्येने सैनिक आहेत. या ठिकाणी २४ तास जागता पहारा दिला जात आहे. विशेष डॉग स्कॉडही तैनात करण्यात आले आहेत. येथे वारंवार तपासणी केली जात असून कोणत्याही पद्धतीचा गोंधळ उडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

वाचा :-भारताने भूटान, मालदिवला पाठवली कोरोनाची लस

दरम्यान, ७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरणार आहेत. विशेष म्हणजे बायडेन यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला होता तेव्हा ते सर्वात कमी वयाचे खासदार म्हणून निवडून आले होते. बायडेन हे आपल्या कुटुंबाचा वारसा असणाऱ्या १२७ वर्ष जुन्या बायबलच्या साक्षीने शपथ घेतील. बायडेन शपथ घेत असतानाच त्यांची पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या नव्या फर्स्ट लेडी जिल बायडेन या हातात बायबल घेऊन उभ्या असतील. बायडेन हे शपथ घेतल्यानंतर लगेचच अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिलं अध्यक्षीय भाषण देतील. हे भाषण भारतीय वंशाच्या विनय रेड्डी यांनी लिहिले आहे. तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या पहिल्या महिला तसेच दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती ठरणार आहेत. कमला हॅरिस यांना सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या लॅटीन सदस्य असणाऱ्या न्या. सोनिया सोटोमेयर या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील. सोटोमेयर यांनीच बायडेन यांना २०१३ साली उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली होती. कमला हॅरिस या दोन बायबल घेऊन शपथ घेतील. यापैकी पहिले बायबल हे हॅरिस कुटुंबाचे जवळचे मित्र रेगिना शेल्टन यांचे असेल तर दुसरे सर्वोच्च न्यायालयातील आफ्रीन वंशाचे पहिले न्यायाधीश ठरलेल्या थुरगूड मार्शल यांचे असेल.

सामान्यपणे निवडणुकांनंतर सत्तांतरणाची प्रक्रिया सुरू होते. मात्र सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबर रोजी समोर आलेल्या निवडणुकीचे निकाल स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निकालानंतर अनेक आठवड्यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली. महत्त्वाचे म्हणजे ट्रम्प स्वत: या शपथविधीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे नवीन राष्ट्राध्यक्षांसाजे स्वागत जुन्या राष्ट्राध्यक्षांकडून होण्याची परंपरा खंडित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button