breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अनागोंदी कारभारावरून झाडाझडती

नाटय़गृहांच्या तारखांचे ऑनलाइन पद्धतीने वाटप करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पिंपरी पालिकेच्या वतीने सर्वच नाटय़गृहांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली. दोन तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तारखा वाटपांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांची दखल घेत यापुढे ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचे आदेश गावडे यांनी दिले आहेत.

चिंचवडचे रामकृष्ण मोरे नाटय़गृह, सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाटय़गृह आणि भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृह अशी पालिकेची चार नाटय़गृहे आहेत. या ठिकाणी असणाऱ्या समस्या व तक्रारींचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात बैठक झाली. गावडे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुर्गुडे, श्रीनिवास दांगट, आशा राऊत यांच्यासह विविध अभियंते, सहायक आरोग्य अधिकारी, सर्व नाटय़गृहांचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

नाटय़गृहांमधील अस्वच्छता, सदोष ध्वनिक्षेपक यंत्रणा, सतत बिघडणारी वातानुकूलित यंत्रणा, तारखा वाटपांचा घोळ, वाहनतळ, उपाहारगृह आदींविषयी सविस्तर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी तसेच नाटय़गृह व्यवस्थापकांनी सर्व काही आलबेल असल्याची माहिती बैठकीत सादर केली. तथापि, गावडे यांनी सविस्तर चर्चा करत तक्रारी असणाऱ्या मुद्यांवरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सर्वाधिक तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित होत्या. यापुढे कोणतीही तक्रार येता कामा नये, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावण्यात आले. अपूर्ण असलेली सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत, नाटय़गृहांच्या वरच्या भागात सौरऊर्जा बसवण्यात यावे, कचरा साठवणुकीसाठी नाटय़गृहात मोठय़ा कुंडी ठेवण्यात याव्यात,  अशा सूचना त्यांनी केल्या.

सर्व नाटय़गृहांच्या विविध समस्यांसाठी बैठक घेतली. संबंधित अधिकारी व व्यवस्थापकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे महिन्यातून एकदा नाटय़गृहांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात येईल.      – दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी पालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button