breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यातल्या व्यक्तीला दिसला ‘एलिअन’; संपर्क साधत असल्याच्या दाव्याने खळबळ

पुण्यातल्या एका व्यक्तीने आपल्याला परग्रहावरील माणूस अर्थात ‘एलिअन’ दिसल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या एलिअनने आपल्याशी संवाद साधल्याचा दावाही त्याने केला आहे. याबाबत त्याने पंतप्रधान कार्यालयाला पत्रही पाठवले आहे. याची गंभीर दखल घेत पीएमओने राज्य सरकारकडे याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे ही व्यक्ती नक्की कोण आहे याचा शोध घेताना काही काळ पुणे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र, चौकशीअंती असा दावा करणारी व्यक्ती ही मानसिकरित्या आजारी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

पीएमओला पाठवलेल्या पत्रात संबंधित व्यक्तीने आपल्याला घराच्या खिडकीतून एलिअन सदृश्य वक्ती दिसल्याचा दावा केला आहे. तसेच ती व्यक्ती आपल्या ग्रहावर पृथ्वी संबंधीची काही संवेदनशील माहिती पाठवत असल्याचा दावाही त्याने केला आहे. त्यानंतर त्याने याच्या चौकशीसाठी पंतप्रधान कार्यालयाला यासंबंधी इ-मेल पाठवला. हा इ-मेल पीएमओने राज्य सरकारकडे फॉरवर्ड केला आणि याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकारने पुणे पोलिसांना या प्रकरणाची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, सिंहगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पीएमओला इ-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले. त्यानंतर चौकशीअंती खुलासा झाला की, इ-मेल पाठवणारी ४७ वर्षीय व्यक्ती ही मानसिक आजाराने ग्रस्त आहे.

या व्यक्तीला काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. तेव्हापासून त्याने आपले मानसिक स्थैर्य गमावले आहे. काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीने आपल्या बंगल्याबाहेरील झाडांमध्ये दिव्य प्रकाश दिसल्याचे सांगितले आहे आणि त्यालाच त्याने परग्रहावरील व्यक्ती असल्याचा समज करुन घेतला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या व्यक्तीच्या कुटुंबाकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी असा कोणता इ-मेल पाठवल्याची माहिती आपल्याला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या नकळतच त्या व्यक्तीने पीएमओशी इ-मेलद्वारे संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button