breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध

  • अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांचा दावा
  • छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात
  • पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन

मुंबई – देशभरात सुरु असलेल्या नक्षली संबंधाच्या कारवाईवरुन महाराष्ट्र पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. तशी हजारो पत्रे आढळून आली आहेत. त्या पत्रांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, पैसा, हत्यारांचा उल्लेख आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंह यांनी दिली. इतकेच नव्हे तर माओवाद्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन, सरकार उलथवण्याचा डाव होता, असा दावाही त्यांनी केला.

लेखक वरवरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचेही परमवीर सिंह यांनी येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या पाचही जणांच्या घरी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरु आहे. तसेच काही कॉम्प्यूटर्स, लॅपटॉपचे पासवर्ड मिळवले आहे. या सर्व कागदपत्रांवरुन मोठा शस्त्रसाठा विकत घेणे, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेली पत्रेच थेट वाचून दाखवली. यामध्ये कॉम्रेड सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, रोना विल्सन यांच्या पत्रांचा समावेश होता. या पत्रांमध्ये नक्षलवादी चळवळीसाठी कसा प्लॅन करता येईल, पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी, हत्यारे याबाबतचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील काही पत्रांमध्ये आरोपींची जम्मू-काश्‍मीरमध्ये भूमिका असल्याचा उल्लेख आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये कशाप्रकारे दगडफेक करणाऱ्यांना एकत्र आणले जाते, तशाच कल्पना देशभरात कशा राबवता येतील असेही पत्रात लिहिले आहे. अटकेतील सगळ्यांचा मणिपूर, जम्मू काश्‍मीर आणि फुटीरतावाद्यांशी संबंध आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

सुधा भारद्वाज यांच्या पत्रातील तपशील 
प्रोफेसर साईबाबाला शिक्षा झाल्यानंतर संघटनेच्या शहरी भागात काम करणा-या कॉम्रेडमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. ती कमी करण्यासाठी काश्‍मिरमध्ये फुटीरतावाद्यांकडून तिथल्या अतिरेकी संघटना, त्यांचे नातेवाईक आणि दगडफेक करणा-यांना दिल्या जाणा-या पॅकेजच्या धर्तीवर आपण आपल्या शहरी आणि ग्रामिण भागातल्या कॉम्रेडसाठी त्यांच्या कामानुसार पॅकेज निश्‍चित केले पाहीजे. त्यामुळे हे लोक आपल्या संघटनेसाठी पूर्णपणे समर्पण भावनेने काम करत राहतील आणि काम करतांना होणा-या दुर्घटना किंवा कायदेशीर अडचणींना तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतील.

कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडेंचं पत्र 
येत्या काही दिवसांत मोठी कारवाई करावी लागेल. ज्यामुळे आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळेल. कॉम्रेड वरवरा राव आणि कॉम्रेड सुरेंद्र यांनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आणि जंगलातील कॉम्रेडपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी कॉम्रेड सुरेंद्र गडलिंग यांच्यावर मोठ्या कामाची जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठी कॉम्रेड वरवरा रावने काही फंड/पैसे पुरवला आहे. ज्यातील काही पैसा कॉम्रेड सुरेंद्र तुमच्यापर्यंत पोहोचवेल.

तुम्ही त्यांच्या संपर्कात राहून कारवाई करा. 80 गाड्या जाळल्या होत्या, त्या वरवरा राव यांच्या सांगण्यावरुन झाल्या होत्या. त्याबाबतच उल्लेख या पत्रात आहे, असे पोलिसांनी सांगितले. फरार असलेल्या मिलिंद तेलतुंबडे यांनी हे पत्र महाराष्ट्र झोनल कमिटीला लिहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button