महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सातारा- पेट्रोल अन्‌ डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने शुक्रवारी साताऱ्यात अनोखे आंदोलन केले. पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनधारकांना चक्क साताऱ्यातील सुप्रसिद्ध मोदी पेढे देऊन अच्छे दिन आल्याची उपहासात्मक आठवण करून दिली तसेच यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 

शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते साताऱ्यातील रेणुका पेट्रोल पंपावर दरवाढीच्या व भाजप सरकारच्या निषेधार्थ फलक घेवून दाखल झाले. घोषणाबाजी करत त्यांनी वाहनधारकांना पेढे वाटायला सुरुवात केली. सुरुवातीला वाहनधारकांना काही समजेनासे झाले. त्यावर जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व कार्यकर्त्यांनी, भारतात अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने पेट्रोल 87 अन डिझेल 74 रुपयांवर नेवून ठेवले आहे. त्यामुळे भाजपने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अच्छे दिन आणले आहेत त्यामुळे आम्ही मोदी पेढे वाटत असल्याचे ते उपहासात्मक पद्धतीने सांगून जनजागृती करीत होते.

 

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेना सरकार येवून चार वर्षे झाली. या कालावधीत सरकार जनतेला कुठल्याच बाबतीत न्याय देवू शकत नाही. उलट फसव्या जाहिराती व आकडेवारी सादर करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत इंधनाचे दर खाली आलेले असताना हे सरकार उलट दर वाढवून जनतेच्या खिशातून रोज कोट्यवधी रुपयांची लूट करीत आहे. सरकारने लवकरात लवकर दर कमी न केल्यास सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठणार असून प्रत्येक तालुका ठिकाणी व गावागावात अशा प्रकारे पेढे वाटप करून आंदोलन केले जाणार असल्याचे माने यांनी सांगितले.

 

यावेळी दत्तानाना ढमाळ, देवराज पाटील, राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, बाळासाहेब महामुलकर, सुधीर धुमाळ, समीद्रा जाधव, नलिनी जाधव, स्मिता देशमुख, पूनम भोसले, सुजाता घोरपडे, सुवर्णा पवार, नंदिनी जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 एक भूल, कमल का फुल
आंदोलना दरम्यान भाजप सरकारचा धिक्कार असो, एक भूल.. कमल का फुल अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. तसेच भारताचा एक जवान शहीद झाला तर त्या बदल्यात पाकिस्तानचे दहा जण गेलेले दिसतील, अशी डरकाळी मोदींनी फोडली होती. मात्र आज भारतात शहीद होणाऱ्या सैनिकांची संख्या रोज वाढत आहे. त्यावर मात्र मोदी चकार शब्द बोलायला तयार नाहीत अशी खंत सुनील माने यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button