शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई द्या

केंद्राचे बॅंक व विमा कंपन्यांना निर्देश : विमा दाव्यांची माहिती भरण्याच्या मुदतीत वाढ
मुंबई – नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषी मंत्रालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्या 92 टक्के शेतकऱ्यांची माहिती पीक विमा कंपन्यांच्या माहितीशी जुळते, अशा शेतकऱ्यांना विम्याची भरपाई देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित 8 टक्के शेतकऱ्यांची माहिती जुळत नाही ती तातडीने पुनर्निर्धारित करून त्यांनाही भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करावी, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिले आहेत.
खरीप 2017 साठी शेतकऱ्यांनी सादर केलेल्या विमा दाव्यांच्या माहितीची तपासणी करण्यात आली असता त्यात 92 टक्के शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांकाची माहिती ही शेतकऱ्यांच्या माहितीशी जुळत आहे. उर्वरित 8 टक्के शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकांची माहिती ही शेतकऱ्यांच्या माहितीशी जुळत नाही. ही माहिती सुधारित करून घेण्याची जबाबदारी ही विमा कंपन्यांची आहे, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्व विमा कंपन्यांना कळविले आहे.
ज्या शेतकऱ्यांची माहिती जुळली असेल त्यांना विम्याचे दावे तातडीने त्यांचे बॅंक खात्यावर अदा करण्याबाबतही पत्रान्वये सूचित करण्यात आले आहे. तसेच ज्या 8 टक्के शेतकऱ्यांची माहिती जुळत नाही त्यांची नुकसान भरपाईची रक्कम विम्या कंपन्यांनी एक रकमी बॅंकांकडे जमा करून बॅंकांनी त्या शेतकऱ्यांची माहिती जुळवून रक्कम अदा करावी, असे केंद्र शासनाच्या कृषी विभागाने कळविले आहे.
रबी 2017 साठी विमा दाव्यांची माहिती भरण्याची मुदत ही 15 मे 2018 पर्यंत होती, ती आता 15 जून 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे.