शिलॉंगमधील हिंसाचारानंतर केंद्रीय निमलष्करी दल तैनात

- शुक्रवारच्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू
- पंजाबी आणि खांसी रहिवाशांमधील वाद पेटला
- अल्पसंख्यांक आयोग, पंजाब सरकारकडूनही दखल
नवी दिल्ली – शिलोंगमध्ये पंजाबी आणि खांसी रहिवाशांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर तेथे केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे 1 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाचे दोन अधिकारीही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून मेघालयातील परिस्थितीबाबतची नियमित माहिती घेत आहेत. शिलॉंगमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या मागणीनुसार तेथे पुरेशी सुरक्षा दले पाठवण्यात येत आहेत.
आतापर्यंत निमलष्करी दलांच्या 10 तुकड्या मेघालयाकडे रवाना करण्यात आल्या आहेत, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर केंद्र सरकारकडून आणखी सहा तुकड्या तेथे रवाना करण्यास मंजूरी दिली आहे. राज्य सरकारच्या बस चालवण्याच्या मुद्दयावरून पोलिस आणि स्थानिकांमध्ये
शिलॉंगमधील पंजाबी लाईन परिसर आणि खासी चालकांमध्ये गुरुवारपासून एका प्रकरणावरून वादंग सुरू झाला होता. एका बस कर्मचाऱ्याला स्थानिक रहिवाशांकडून मारहाण झाल्यानंतर तेथे शुक्रवारी जोरदार हिंसाचार झाला होता. त्यानंतर संपूर्ण शिलॉंग शहरामध्ये शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी लष्कराने शहराच्या विविध भागांमध्ये ध्वजसंचलन केले होते. मात्र काल संध्याकाळी पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आणि पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या हिंसक घटनांमुळे शिलॉंगमधील सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले आहे. या हिंसाचारात पोलिस कर्मचाऱ्यांसह 10 जण जखमी झाले आहेत. तर एकाला अटक करण्यात आली आहे. आज 7 तास संचारबंदी शिथील करण्यात आली होती.
पंजाबी लाईन परिसरातील या घटनांबाबत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही चिंता व्यक्त केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाब सरकारचे प्रतिनिधी मंडळ मेघालयात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या प्रतिनिधींनीही मेघालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
शिलॉंगमधील हिंसाचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडून तेथे एका सदस्याला पाठवले जाणार आहे. अल्पसंख्यांक आयोगाचे पंजाबमधील सदस्य मनजीत सिंग राय हे शिलॉंगला जाऊन या हिंसाचाराची चौकशी करणार आहेत.
शिलॉंगमधील हिंसाचार स्थानिक असून यामध्ये काही व्यक्तींचे हितसंबंध गुंतले असल्याने याला जातीय हिंसाचाराचा रंग दिला जात असल्याचे म्हटले आहे. हिंसाचार भडकावण्यासाठी काही गटांकडून पैशांचे आणि दारुचे वाटप केले गेले असल्याचे पुरावे आहेत.
कोनार्ड संगमा
मुख्यमंत्री, मेघालय