वायरने गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून; रहाटणीतील मन हेलावून सोडणारी घटना

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वायरने गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रहाटणी येथे गुरूवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुंडलिक शामराव वाघमारे (वय 34, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उत्तम महादू जाधव (वय 36, रा. रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिक यांची बहीण वंदना आणि आरोपी तिचा पती उत्तम यांच्यात वारंवार भांडण होत असे. उत्तमला दारूचे व्यसन आहे. त्यांना दीपाली जाधव (वय 10) आणि ओंकार जाधव (वय 8) ही दोन मुले आहे. दररोज किरकोळ कारणांवरून उत्तम पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण करीत असे. वंदना रहाटणी परिसरात धुण्या-भांड्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होती.
गुरुवारी पहाटे पुंडलिक यांना त्यांच्या भावाने सांगितले की, ‘वंदनाच्या घरी भांडण झाले आहे.’ त्यानुसार दोघेही तात्काळ वंदना यांच्या घरी आले. त्यावेळी वंदना मोरीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. पुंडलिक आणि त्यांच्या भावाने वंदना यांना कारमधून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना औंध रुग्णालयात नेण्यास सांगितले. दरम्यान पुंडलिक यांच्या भावाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. औंध रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारापूर्वीच वंदना यांना मृत घोषित केले. पत्नीचा खून करून दोन्ही मुलांना सोडून बाप निघून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.