वाढता उष्मा आंब्यांना देखील असह्य़!

राज्यात उष्णतेची लाट आली असून वाढत्या उष्म्याचा परिणाम आंब्यांवरही झाला आहे. उष्म्यामुळे आंबा लवकर पक्व होत असून त्याचा काहीसा परिणाम फळांवर होत आहे.
श्री शिवछत्रपती मार्केटयार्डातील घाऊक फळबाजारात रत्नागिरी हापूसच्या ७ ते ८ हजार पेटय़ांची आवक होत आहे. कर्नाटक आंब्यांची आवकही वाढली असून फळबाजारात १५ ते १६ हजार पेटय़ांमधून कर्नाटक हापूसची आवक झाली. कर्नाटक हापूसची हंगामात दुसऱ्यांदा मोठी आवक झाली आहे. येत्या काही दिवसांत कर्नाटक हापूसची आवक आणखी वाढेल, अशी माहिती कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. रत्नागिरी हापूसच्या तुलनेत कर्नाटक हापूसची साल जाडसर असल्याने कर्नाटक आंब्यांवर उष्म्याचा परिणाम होत नाही. सध्या तापमान वाढल्याने आंबा दोन दिवसांत पक्व होतो. त्यामुळे आंब्यांच्या पेटीवर आच्छादन काढून तो हवेवर ठेवावा लागत आहे, असे उरसळ यांनी नमूद केले.
वाढत्या उष्म्याचा आंब्यांवर परिणाम झाला आहे. फळ लवकर पक्व होत आहे. हापूस पक्व होण्यास साधारणपणे ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. मात्र, तापमानाचा पारा सध्या चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने आंब्यावर परिणाम होत आहे. आंबा खराब होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. झाडावर लगडलेली फळे पक्व होण्यास साधारपणे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. उष्म्यामुळे फळे चार ते पाच दिवसांत पक्व होत आहेत, आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
आंब्याचे दर
रत्नागिरी हापूस (तयार ४ ते ८ डझन पेटी)- २००० ते ३५०० रुपये, कर्नाटक हापूस (कच्चा ४ ते ५ डझन पेटी)- ६०० ते १२०० रुपये, कर्नाटक पायरी (४ डझन)- ५०० ते ८०० रुपये, लालबाग- २० ते ३५ रुपये किलो, मलिका- ३० ते ४५ रुपये किलो, तोतापुरी- २० ते ३५ रुपये किलो
आंबा आवाक्यात नाही
देवगड, रत्नागिरी हापूसची आवक बाजारात वाढली आहे. मात्र, अद्याप आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात नाहीत. पुढील आठवडय़ात अक्षय तृतीया आहे. तेव्हा आंब्यांची आवक वाढून दर उतरण्याची शक्यता आहे.