breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणीसाठी ३२ पथके ; पाच लाखाचा दंड वसूल

पिंपरी – शहरात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय चार याप्रमाणे ३२ पथके स्थापन केली आहेत. संबंधित बंदीला अनुसरून आवश्‍यक कार्यवाही करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

प्रत्येक आरोग्य निरीक्षकाला क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध भाजी मंडईत पंधरा दिवसांतून एकदा, व्यापारी क्षेत्र, मटण/मच्छी विक्रेते येथे आठवड्यातून एकदा आणि रोज किमान १० दुकानांची तपासणी करून त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती केली जाणार आहे. नॉन-ओव्हन पिशव्यांवर संपूर्ण बंदी आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल.

फेरीवाले, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, स्वच्छ संस्था, व्यापारी, प्लॅस्टिक असोसिएशन आदी संघटनांची बैठक आयोजित केली आहे. प्लॅस्टिक व थर्माकोल यांच्या पुनर्वापराच्या अनुषंगाने रस्त्याच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर करण्याच्या नियोजनाबाबत स्थापत्य विभागास कळविले आहे. प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीला अनुसरून कचरा वेचकांसाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

राज्यभरात २३ मार्चपासून लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीची जिल्हास्तरावरील अंमलबजावणीची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात राज्यातील महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. महापालिका कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार, सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहायक आरोग्याधिकारी यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोल वस्तूंचा वापर, साठवणूक, हाताळणी याबाबत लागू केलेल्या बंदीची सक्त अंमलबजावणी करावी, असे गावडे यांनी नमूद केले.

पाच लाखांचा दंड वसूल
प्लॅस्टिकबंदीअंतर्गत आतापर्यंत ९९ नागरिक व दुकानदारांकडून चार लाख ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापुढील काळात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदी अंमलबजावणीची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. नागरिक, व्यापारी, उत्पादक, व्यावसायिक, संघटना, संस्था यांनी प्लॅस्टिक व थर्माकोलबरोबरच नॉन-ओव्हन पिशव्यांचा वापर करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button