लोकांची नाराजीच भाजपची सत्ता उलथवून टाकेल, सत्यजित देशमुख यांचे प्रतिपादन

- कार्यकर्त्यांनो निवडणुकीबाबत तर्कवितर्क लढवू नका
- निवडणूक लढण्याच्या दृष्टीने कामाला लागा
शिराळा – (प्रतिनिधी) – कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या बाबतीत तर्कवितर्क न मांडता निवडणूक लढण्याच्या दृष्टीने कामाला लागावे. भाजप सरकारच्या काळात युवकांना नोकरी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालास भाव नाही. महागाईचा उच्चांक झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वच घटक असमाधानी आहेत. लोकांमधील नाराजीच भाजपची सत्ता उलथवून टाकेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील, माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, सर्जेराव पाटील, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस एन. डी. पवार, शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, जे. डी. खांडेकर, सुजित देशमुख, सुभाष पाटील, सम्राटसिंह शिंदे, श्रीरंग नांगरे, पोपट पाटील, मोहन पाटील, धनाजी नरुटे, सतीश सुतार, दिलीप भोसले, एम. बी. भोसले, कैलास पाटील, विष्णू पाटील, बजरंग चरापले, जयवंत शिंदे, बाबासाहेब वरेकर, शिवाजी पाटील, महेंद्र पाटील, जयदीप पाटील, दिलीप भोसले, किरण थोरात, सतीश पाटील, भारत जांभळे, संजय महिंद, बंडा पाटील, सुभाष धुमाळ, राहुल पाटील, मानसिंग बिळासकर, ए. बी. पाटील, अशोक पाटील, बाळू कांबळे, धनाजी माने आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्यजित देशमुख म्हणाले की, भाजप सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. महागाईने कहर केला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दररोज वाढत आहेत. शेतमालास भाव नाही, युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. नोकरदारांना दररोज नवनवीन आदेश काढत आहेत. जीएसटी, नोटाबंदीने सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला आहे. भाजप सरकारला विरोध व निषेध करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, प्रत्येक गावनिहाय नियोजन करून आगामी निवडणुकीची आखणी करावी. कार्यकर्त्यांनी तर्कवितर्क न लावता निवडणूक लढायची आहे. या उद्देशाने कामाला लागावे, पुलाखाली बरेच पाणी जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संघटना सक्षम करण्यासाठी काम करावे, असेही आवाहन देशमुख यांनी केले.
आनंदराव पाटील, के. डी. पाटील, सम्राटसिंह शिंदे, भानुदास मोटे, अँड. रवि पाटील, संग्रामसिंह पवार यांनी मनोगत व्यक्त केले.