राज ठाकरेंना कुणाच्या स्क्रिप्टची गरज नाही – अजित पवार

पुणे – राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपाच्या बाजूने भाषण करत होते तेव्हा भाजपाच्या नेत्यांना मनातून उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होत. आता राज ठाकरे जेव्हा मोदींच्या विरोधात बोलत आहेत तेव्हा विनोद तावडे पोपटासारखे बोलू लागले, त्यांच्यावर टीका करायला लागले असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
राज ठाकरे जेव्हा भाषण करत असतात, तेव्हा ते अनेक गोष्टी स्क्रिनवर दाखवतात आणि मग त्यावर त्यांची भूमिका मांडतात. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत त्यांना कुणी कशाला स्क्रिप्ट लिहून देईल? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांची स्क्रिप्ट बारामतीतूत येते. ते एक उत्तम अभिनेते आहेत, जसं लिहून दिलंय तसाच अभिनय करत असतात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी जेव्हा पहिल्यांदा भाषण केलं तेव्हा शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं असा ट्विट करून आशिष शेलार यांनी टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना बारामतीचा पोपट अशीही उपमा दिली होती. या सगळ्या टीकेला अजित पवार यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.