मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण बंदला नाही – शिवसेनेची भूमिका

मुंबई – मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज (बुधवारी) मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहनही मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे. समन्वयकांकडून सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम होणार नसल्याचं सांगितलं असलं तरी खासगी वाहनं रस्त्यावर उतरू देणार नसल्याचा पवित्रा मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे मात्र मुंबई बंदला पाठिंबा नाही अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. आजच्या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही, पण आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं. बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही शिवसेनेकडून मराठा मोर्चेकऱ्यांना करण्यात आलं आहे.
यापूर्वी, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत मराठा समाजाच्या उद्रेकाबाबत सविस्तर माहिती देत मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी केली आहे, तर राज्य सरकार मराठा आरक्षणात वेळकाढूपणा करत असल्यानेच मराठा समाजात उद्रेक झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.