निकृष्ट आहार दिल्यानेच मंजुळा शेटय़ेला मारहाण

प्रत्यक्षदर्शी सहकैद्याची सत्र न्यायालयापुढे साक्ष
भायखळा कारागृह अधिकाऱ्यांच्या खबऱ्यांना खराब अंडी दिल्यानेच वॉर्डन आणि कैदी मंजुळा शेटय़े हिला कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेदम माराहाण केली, अशी साक्ष या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व सहकैद्याने मंगळवारी सत्र न्यायालयासमोर दिली.
कारागृह अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला कारागृह पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहाजणींविरोधात मंजुळाची हत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी या प्रकरणातील दुसरी साक्षीदार आणि सहकैदी असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यास सुरुवात झाली. साक्ष नोंदवताना आरोपी हजर नसल्याने साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवू नये, असा दावा करत आरोपींच्या वकिलांनी त्याला विरोध केला. मात्र न्यायालयाने मागणी फेटाळून लावली.
या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आपल्या साक्षीत, घटनेच्या काही महिने आधीच कारागृह अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा पोखरकर यांची कैद्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्या कैद्यांना सतत शिवीगाळ करत असत. मंजुळाला मारहाण केल्यानंतर तिला मदत करणाऱ्यांचीही हीच अवस्था केली जाईल, असे पोखरकर यांनी अन्य महिला कैद्यांना धमकावले होते. त्यामुळे कुणीही मंजुळाला मदत करण्यास पुढे गेले नाही, असे न्यायालयाला सांगितले.